नागपूर : पूर्वी नालीतून वाहणारे घाण पाणी कुणाच्याच कामाचे नव्हते. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्नही उपस्थित होत होता. परंतु आता हे घाण पाणी विकून स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे मिळू लागले आहेत, असे सांगत भविष्यात कचऱ्यासाठी दंगली होतील, असे भाकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केले.
नागपुरात सी. ए. अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. नितीन गडकरी पुढे म्हणाले, नागपुरातून रोज मोठ्या प्रमाणावर सांडपाणी निघते. या सांडपाण्यातून प्रदूषणाचा प्रश्नही उपस्थित होतो. दुसरीकडे कोराडी येथील औष्णिक विद्युत प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात रोज पाण्याची गरज होती. त्यामुळे नागपूर महापालिकेला पाणी शुद्धिकरण प्रकल्प उभारून ते पाणी महानिर्मितीला देण्याचा उपक्रम सुरू केला. त्यामुळे आता महापालिकेला या सांडपाण्यातून ३०० कोटी रुपये मिळतात. हा प्रयोग इतरही एका ठिकाणी केला.
दरम्यान औष्णिक विद्युत प्रकल्पातून निघणाऱ्या राखेचाही प्रश्न गंभीर होता. परंतु आता या राखेतून वीट तयार करणे, महामार्गावरील भरण कामासह इतरही बऱ्याच कामात ती वापरली जात असल्याने मागणी वाढली. कचऱ्यापासूनही आता जगाच्या काही प्रगत देशात वीज निर्मितीसह नावीन्यपूर्ण प्रकल्प सुरू आहे. त्यामुळे लवकरच भारतातही हे प्रकल्प सुरू होतील. त्यानंतर कचऱ्याची किंमत वाढून भविष्यात कचऱ्यासाठीही दंगली होतील, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
भारतीय नागरिक लोकसंख्या वाढीसह ऑटोमोबाईल क्षेत्रातील वाहनांची संख्या वाढवण्यातही तज्ज्ञ आहेत, असेही गडकरी यांनी सांगितले.
महसूल १२ लाख कोटींवर
राष्ट्रीय महामार्गावरील पथकरातून आता ५६ हजार कोटी रुपये मिळत आहे. ही आकडेवारी येत्या दोन वर्षांमध्ये १ लाख ४० हजार कोटी रुपयांवर जाईल. तर पंधरा वर्षांचा अंदाज लावल्यास १२ लाख कोटी रुपये पथकरातून मिळणे शक्य असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
नागपूर महापालिकेत निष्क्रिय लोक
वर्धा रोडवर डिफेन्सची रेल्वे लाईन होती. ही जागा महापालिकेला आग्रह धरून २ कोटी ५० लाख रुपयांत घ्यायला लावली. त्यावेळी महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून विरोध होत होता. तेथे निष्क्रिय लोक असल्याने असे होत होते. परंतु ही जागा घेतल्यावर तेथे पूर्वी लंडन स्ट्रिट व आता ऑरेंज स्ट्रिट असे नाव दिले गेले. तेथे सध्या तीन ते चार प्रकल्प पूर्ण होऊन महापालिकेला कसलीही लागत न लावता सुमारे ९०० कोटी रुपये मिळाले. आणखी प्रकल्प पूर्ण झाल्यावर किमान २ हजार ५०० कोटी रुपये मिळणार असल्याचे गडकरी यांनी सागितले.