नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. शुक्रवारी नागपुरातील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी खासगी प्रॅक्टिस चालत नसलेले वकील, आर्किटेक्स सरकारकडे असल्याचे वक्तव्य केले. नितीन गडकरी नेमके काय म्हणाले, त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
शासकीय उपक्रमातील अभियंत्यांचे नितीन गडकरी यांनी कान टोचत म्हणाले, सरकारी अभियंते असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये चल जाता है वृत्ती खूपच धोकादायक आहे. या पद्धतीने अनेक कामे बिघडली आहे. त्याला राजकारणी, मंत्रीसह अभियंतेही जबाबदार आहे. अभियंत्यांच्या व्यवसायिक धर्मानुसार त्याने दर्जेदार कामाशी तडजोड करायला नको. परंतु सरकारी पद्धतीत वेगळेच बघायला मिळते. राष्ट्रीय मार्ग प्राधिकरणात (एनएचआ) हजारो अभियंते कार्यरत आहे. त्यात आयआयटीसह इतरही मोठ्या संस्थेत शिकलेल्या अभियंत्यांचा समावेश आहे.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्रीपदाची जवाबदारी आल्यावर मी एनएचआयच्या अधिकाऱ्यांना विचारले की देशात एकतरी महामार्ग दाखवा जेथे रस्त्याच्या शेजारील तयार नाल्यांमध्ये पाणी वाहते. मला मागील १२ वर्षात अशा नाल्या भेटल्या नाही. इतक्या निकृष्ठ नाल्या आहेत. मला त्याचे कारण समजले. आता मी प्रिकास्ट सक्ती केली आहे. महामार्गावरील सुरक्षा भिंतीबाबत गडकरी म्हणाले, राजस्थान- जामनगर दरम्यान रस्त्याची पाहणी करतांना एका सुरक्षा भिंतीवरून श्वान उडी मारून महामार्गावर आला. यावेळी अधिकाऱ्यांना ते दाखवले. सुरक्षा भिंत कशी असावी? हेही सांगावे लागणे आश्चर्य असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
गडकरी म्हणतात… भारतीय नागरिक चांगले ॲथलेटिक्स
नितीन गडकरी म्हणाले, भारतीय नागरिक चांगले ॲथलेटिक्स आहेत. रस्त्याच्या वा पुलाच्या मधातून थोडीही जागा दिसल्यास त्यावरून ते शिताफीने उडी मारतात. नागपुरातील वर्धा रोडवरील उदाहरन देत त्यांनी येथेही लोखंडी ग्रील लावण्याची सूचना केली होती. परंतु अधिकाऱ्यांनी दोन ग्रीलच्या मधात थोडे अंतर ठेवले. त्यावर संबंधिताला मी तेथून कुणी जाणार नाही काय? हा प्रश्न केला. त्यानंतर दुरूस्ती केली गेली. त्यामुळे प्रत्यक्षात डोके लावून काम करण्याची गरज असल्याचेही गडकरी म्हणाले.
कंत्राटदार, अभियंते, नगरसेवकांना प्रत्येक वर्षी खराब होणारे रस्ते हवे…
राज्यात मंत्री असतांना खूप वर्षांपूर्वी नागपुरात सिमेंट रस्ते केले. त्यावर एकाने खुप चांगले डिझाईन झाल्याची प्रशंसा केली. तर दुसरीकडे हे रस्ते खूप जाड झाल्याचा आरोप झाला. हे रस्ते माझ्यासह माझ्या पुढील तीन पिढी खरार होणार नाही, असे झाले आहे. परंतु कंत्राटदार, अभियंते, नगरसेवकांना मात्र प्रत्येक वर्षी हे रस्ते व्हावे, असे रस्ते हवे असल्याचेही विनोदाने गडकरी यांनी सांगितले. रस्त्यांच्या दर्जाशी तडजोड योग्य नसल्याचेही गडकरी म्हणाले.