नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वडीलोपार्जित गाव धापेवाडा, नागपूर जिल्ह्यातील एक सांस्कृतिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण बनत आहे. धापेवाडा येथे गडकरी यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या टेक्सटाईल उद्योगाने स्थानिक कापड सामग्रीला एक नवीन ओळख दिली आहे. नुकतेच येथे ५ कोटी रुपयांच्या खर्चाने हातमाग केंद्रासाठी एक मोठी इमारत उभी करण्यात आली असून, त्याचे औपचारिक उद्घाटन येत्या जानेवारी महिन्यात होणार आहे.

धापेवाडा टेक्सटाईलमध्ये कोश्याच्या साड्या तयार केल्या जातात. सहा महिन्यांपूर्वी मुंबईतील काही मॉडेल्स नागपूरमध्ये आल्या होत्या आणि त्यांनी या साड्यांचे प्रदर्शन केले. प्रदर्शनानंतर या साड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, सध्या १२ हजार रुपयांच्या या साड्यांसाठी वेटिंग लिस्ट तयार झाली आहे. धापेवाडा येथे साड्या बनविल्या जातात तर प्रिंटिंग झारखंडमध्ये केले जाते.

हातमाग केंद्राच्या उद्घाटनासाठी विशेष आकर्षण म्हणजे अभिनेत्री हेमामालिनी आणि रवीना टंडन यांचा सहभाग. धापेवाडा टेक्सटाईलच्या साड्या परिधान करून त्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. गडकरी यांनी सांगितले की, येथील हातमाग वस्त्र युरोप, अमेरिका तसेच जगभरात निर्यात करण्याचा मानस आहे. “हातमाग वस्त्र लोकप्रिय व्हावे यासाठी आम्ही सतत प्रयत्न करीत आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

धापेवाडा टेक्सटाईलचा विकास स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्थानिक कापड उद्योग आणि हस्तकला यामुळे गावाची ओळख फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही वाढेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

याचवेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कळमेश्वर शहरातील विकास प्रकल्पांचा भूमिपूजन कार्यक्रमही पार पडला. ते म्हणाले की, कळमेश्वर शहर सॅटॅलाइट सिटी म्हणून विकसित होईल आणि येथील हातमाग उद्योगाच्या माध्यमातून हे शहर जागतिक नकाशावर उभे राहील.

कळमेश्वरमधील रेल्वे क्रॉसिंगवर ५३६ मीटर लांबीचा रेल्वे उड्डाण पुल उभारला जाणार असून, यासाठी ५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे रेल्वे फाटक बंद होऊन वाहतुकीत होणाऱ्या विलंबापासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे, तसेच वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.

याशिवाय वन टाइम इम्प्रूव्हमेंट योजनेअंतर्गत ९.५ किमी रस्त्यांचे दुभाजकांसह सुधारणा, पादचारी मार्ग, बस थांबे, जलनिस्सारण सुविधा, पथदिवे आणि पुलांची पुनर्बांधणी अशा विविध सुविधा योजनेत समाविष्ट आहेत. ९६ कोटी रुपयांच्या या तरतुदीने कळमेश्वरमधील रस्ते आणि वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित व आधुनिक बनविण्याचे उद्दिष्ट आहे.