नागपूर : भारतीय जनता पक्षात इतर पक्षातून आलेल्यांना मानाचे स्थान दिले जात असून पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना मात्र डालवण्यात येत आहे. आता या प्रकाराला पक्षातून उघड विरोध होत आहे. काही दिवसांपूर्वी याच मुद्यावर सोलापूर येथे भाजप कार्यालयासमोर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तर केंद्रीय मंत्री व भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी इतर पक्षातून आलेल्यांना महत्वाची पदे आणि जुन्या, जोपासलेल्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले आहे.
अलिकडे कळमेश्वर येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन गडकरींच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात गडकरी यांनी पक्षातील सध्याच्या घडामोडींवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “डॉ. राजीव पोतदार हे भाजपचे जुने, प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ते आहेत. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्याबाबतीत न्याय करत नाही. ‘घर की मुर्गी दाल बराबर’ अशी एक म्हण आहे. तशीच परिस्थिती पक्षात दिसते. बाहेरून आलेले लोक सावजी चिकन सारखे जास्त गोड वाटतात, पण जुन्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी आयुष्य दिले आहे. त्यांच्याकडे लक्ष देणेही गरजेचे आहे. व्यासपीठावर उपस्थितीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उद्देश्शून ते म्हणाले, आता मी पक्षाच्या थेट संघटनात्मक जबाबदारीत नाही.
तुम्हीच नेतृत्व करत आहात. पण, जर या जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले, तर ज्या वेगाने पक्षवर जात आहे, त्याच वेगाने खालीही येईल. त्यामुळे पक्षाने आपल्या मुळांशी जोडले गेलेल्या कार्यकर्त्यांना विसरू नये, असेही गडकरी म्हणाले. नगरपालिका निवडणुका झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे डॉ. पोतदार यांच्याबाबत सकारात्मक निर्णय घेतील. पोतदार यांच्या रूपाने भाजपला एक प्रामाणिक आणि समर्पित कार्यकर्ता लाभला आहे, हे विसरून चालणार नाही, असेही गडकरी म्हणाले. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आमदार आशिष देशमुख व्यासपीठावर होते.
दिवंगत भाजप नेत्याच्या मुलाला कंत्राट
भाजपचे दिवंगत नेते सोनबा मुसळे यांच्या मुलाला रेल्वे उड्डाणपूल तसेच कळमेश्वर येथील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे कंत्राट मिळाले आहे. या कामांची गुणवत्ता उत्तम राखण्याच्या सूचनाही गडकरी यांनी दिल्या. मुसळे यांनी एकदा विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, ते शासकीय कंत्राटदार असल्याने त्यांचा अर्ज बाद ठरला होता. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने वडिलांचा व्यवसाय सांभाळला असून आता त्याला महत्त्वाची कामे मिळत आहेत.
