नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही भारतातील एक प्रमुख स्वयंसेवी, सांस्कृतिक व सामाजिक संघटना आहे. १९२५ साली डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर येथे याची स्थापना केली.
आरएसएस हा जरी एक सामाजिक-सांस्कृतिक संघ म्हणून ओळखला जात असला, तरी भारतीय राजकारणात त्याचे अप्रत्यक्ष परंतु प्रभावी स्थान आहे. संघ थेट राजकारणात सहभागी होत नसला तरी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि इतर अनेक संघटनांना त्याची वैचारिक व संघटनात्मक प्रेरणा मिळते. भाजपच्या धोरणांमध्ये, निवडणूक रणनितीत आणि नेतृत्व घडविण्याच्या प्रक्रियेत संघाची छाप स्पष्टपणे दिसते. देशातील प्रमुख पंतप्रधान आणि मुख्यमंत्री स्तरावरील अनेक नेते संघशाखेतून तयार झाले आहेत.
निवडणुकीच्या काळात स्वयंसेवकांची तळागाळातील काम करण्याची पद्धत आणि समाजाशी संपर्क यामुळे भाजपला संघाचा मोठा आधार मिळतो. त्यामुळे आरएसएस हे केवळ सांस्कृतिक नव्हे तर भारताच्या राजकीय घडामोडींवर निर्णायक परिणाम करणारे केंद्र मानले जाते. आरएसएसवर विरोधक कायम देशविरोधी असल्याचा आरोप करतात. आरएसएसचे धोरण विषमतावादी असल्याचा आरोपही केला जातो.
आरएसएसवर तीन वेळा केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. पहिली बंदी १९४८ मध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर नेहरू सरकारने घातली. दुसरी बंदी १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी सरकारने घातली, कारण संघाचे स्वयंसेवक सरकारविरोधी आंदोलनात सक्रिय होते. तिसरी बंदी १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर लादण्यात आली, पण काही महिन्यांतच ती देखील उठविण्यात आली. आता केंद्रीय मंत्री आणि स्वयंसेवक नितीन गडकरी यांनी आरएसएसच्या स्थापनेमागील खरा उद्देश सांगितला आहे. डॉ.हेडगेवार यांनी आरएसएसची स्थापना का केली, यावर गडकरींनी माहिती दिली.
काय म्हणाले गडकरी?
लोणावळा येथील मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या सुवर्ण महोत्सवीवर्षानिमित्त नागपूरमध्ये ‘मनशक्ती सन्मान सत्कृत्याचा’ पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. भानुताई गडकरी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी गडकरी म्हणाले,‘आपला देश पराक्रमी होता, अनेक राजांजवळ शौर्य होते, शक्ती होती. मात्र, कोलकत्तामध्ये व्यापार करणाऱ्या इंग्रजांनी व्यापार करता करता संपूर्ण देश पादाक्रांत केला आणि युनियन जॅक देशावर फडकवला. डॉ.हेडगेवार यांनी याचे कारण काय याबाबत विचार केला. आपल्या समाजामध्ये राजे वेगवेगळे होती, त्यांच्यात आपसात भांडणे होती, एकवाक्यता नव्हती, एकता नव्हती, संघर्ष होता. याचा फायदा इंग्रजांनी घेतला, एकाला हरवण्यासाठी दुसऱ्याचा वापर केला आणि सर्व राज्यांना पराभूत करून सत्ता स्थापन केली. तेव्हा हेडगेवारांनी आपल्याला सुसंघटित, संस्कारित, शक्तिशाली भारतीय समाज म्हणजे हिंदू समाज उभा केला पाहिजे असा विचार करत संघाची स्थापना केली.’