वर्धा : जाती धर्माचे बंधन झुगारून देत होणाऱ्या विवाहाला कुटुंबाचा क्रोध व समाजाचा रोष सहन करावा लागण्याच्या घटना नेहमीच्याच. मात्र, अशा युगुलास हिंमत देत त्यांचा ‘सत्यशोधकी’ विवाह लावून देण्याचा उपक्रम स्तूत्य ठरत आहे.सेवाग्राम येथील सागर चौधरी व नागपूर जिल्ह्यातल्या जामठा येथील श्वेता ढगे यांचे प्रेम जुळले. श्वेता ही यशवंत महाविद्यालयात विधि शाखेचे शिक्षण घेत आहे तर सागर गाडी चालविण्याचा व्यवसाय करतो. दोघांची ओळख झाली व पुढे त्यात प्रेमांकुर फुटला. एकमेकांशिवाय जगू शकत नाही, अशी मानसिकता झाल्यावर दोघांनी लग्न करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, जातीच्या बाहेर लग्न म्हणून दोघांच्याही कुटुंबाने कडाडून विरोध केला. मुलीच्या कुटुंबाचा विरोध दिसून आल्यानंतर सेवाग्रामचे राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते नितीन पाटील यांनी पुढाकार घेतला. पाटील यांनी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे गजेंद्र सूरकार यांना भेटून मार्ग काढण्याची विनंती केली. त्यानंतर श्वेता व सागरला वर्धेत बोलावून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी दोघेही लग्न करण्याबाबत ठाम दिसून आल्याने त्यांना समाज व कुटुंबाच्या विरोधाची पूर्व कल्पना देण्यात आली. ते गृहीत धरून हे दोघेही लग्नाबाबत आग्रही राहल्याने त्यांचा विवाह लावून देण्याचे ठरले. वर्धा वर्धन केंद्राच्या सभागृहात हा विवाह पार पडला. विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. लग्नाचा विधी संघटनेचे निखिल जवादे यांनी पार पाडला. सुनील ढाले, प्रकाश कांबळे व गजेंद्र सुरकार यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता केली. सर्व विधी महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विवाह पद्धतीनुसार पार पडला.