नागपूर: केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या भारतीय वनसेवा परीक्षेचा निकाल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून या परीक्षेतील मराठी टक्का वाढला आहे. यावर्षी महाराष्ट्रातील १८ मराठी उमेदवारांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली.
या निकालानंतर उपलब्ध पदांच्या संख्येनुसार नियुक्त्या केल्या जातील. महाराष्ट्रातील आनंद खंडेलवाल यांनी दुसरी रैंक मिळवली. चिपळूण येथील सिद्धार्थ जैन यांनी चौथी रैंक मिळवली. पहिल्या दहामध्ये मराठी उमेदवारांचा समावेश आहे. मागीलवर्षी प्रतीक्षा काळे यांनी दुसरी रैंक मिळवली होती. काही वर्षांपूर्वीपर्यंत मात्र या परीक्षेत मराठी टक्का फार कमी होता. आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश यांचेच वर्चस्व होते. मात्र, अलीकडच्या काही वर्षात भारतीय वनसेवेत मराठी उमेदवारांची संख्या वाढत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय पोलीस सेवा, भारतीय वनसेवा, भारतीय प्रशासकीय सेवेतील अनेक आजी-माजी अधिकारी उमेदवारांकडून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करून घेत आहेत. त्यांनी ‘व्हॉट्सअॅप समूह’ तयार केला आहे. यात भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी महेश भागवत, मध्य प्रदेशातील वनसेवेतील अधिकारी श्रेयस श्रीवास्तव, अहमदाबाद येथील भारतीय महसूल सेवेतील नितीश पाथोडे, महाराष्ट्र उच्च शिक्षा संचालक डॉ. शैलेंद्र देवलकर महाराष्ट्रातील भारतीय वनसेवेतील अधिकारी पीयूषा जगताप, महाराष्ट्रातील भारतीय वनसेवेतील अधिकारी रविकिरण गोवेकर, समीर उन्हाळे, भारतीय वनसेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुनील लिमये, डॉ. भावना पटोले यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील १८ उमेदवार उत्तीर्ण
भारतीय वन सेवेत महाराष्ट्रातील यशवंतांचा टक्का वाढत आहे. यावर्षी १४३ पैकी १८ महाराष्ट्रातील आहेत. आनंद खंडेलवाल आणि सिद्धार्थ पारसमल जैन हे पहिल्या पाचमध्ये आहेत. ११२ रैंक मिळालेला देवानंद तेलगोटे हा करोना काळात १२० दिवस मृत्यूशी झुंज देत होता, त्याने चिकाटीने अभ्यास केला. ‘व्हॉट्सअॅप समूहा’च्या मदतीने आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आणि मुलाखतीसाठी ऑनलाईन चर्चाही करतो. – महेश मुरलीधर भागवत, अतिरिक्त पोलीस महासंचालक, तेलंगणा