नागपूर : महाराष्ट्रातील वणव्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून राज्यातील गडचिरोली जिल्हा वणवे लागण्यात आघाडीवर आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यात १८ हजार ४४३ घटना घडल्या. तर एकटय़ा गडचिरोली जिल्ह्यात चार हजार ६८५ घटना वणव्याच्या घडल्या आहेत.

मानवी हस्तक्षेप आणि वनव्यवस्थापनातील त्रुटी यामुळे राज्यातील वणव्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील काही वर्षांपासून वणव्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे, ज्यामुळे जंगलांची मोठय़ा प्रमाणावर हानी होत आहे. मानवी हस्तक्षेपामुळे आणि जंगलांचे क्षेत्र कमी झाल्यामुळे वणव्यांच्या घटना वाढत आहेत.

याबाबत माहिती अधिकारात अभय कोलारकर यांनी मागितलेल्या माहितीत गेल्या तीन वर्षांत राज्यातील वणव्यांची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक वणवे जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत लागले आहेत. या नऊ महिन्यात तब्बल आठ हजार ०९१ वणव्याच्या घटना राज्यात आहेत. तर २०२३ या वर्षांत पाच हजार १७१ व २०२४ या वर्षांत पाच हजार १८१ वणव्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. राज्यात सर्वाधिक वणवे गडचिरोली जिल्ह्यात २०२३ मध्ये १३२९, २०२४ मध्ये १४९७ तर २०२५ मध्ये अवघ्या नऊ महिन्यात १८५९ वणवे लागले. गडचिरोलीनंतर ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक वणवे आणि त्यानंतर नाशिक येथे सर्वाधिक वणव्यांच्या घटनांची नोंद झाली आहे.

वनक्षेत्र वर्ष २०२३      वर्ष २०२४      वर्ष २०२५

चंद्रपूर २१६    १७९    ४४८

गडचिरोली     १३२९   १४९७   १८५९

नागपूर २९४    ४२२    ८२७

अमरावती      १५३    ९२     ४९०

यवतमाळ      १०३    २१     २९०

छ. संभाजीनगर १५८    १०८    ३१४

नाशिक ५९२    ७५०    ८०२

धुळे    ४२५    ३३५    ५२५

ठाणे   ९२३    ९२७    ९०१

पुणे    १९७    १४१    २३४

कोल्हापूर      ४९९    ३८१    ४५८

नागपूर(वन्यजीव)      २९     ११६    ६४७

मुंबई(वन्यजीव) २५३    २१२    २९६