नागपूर : शहरात सोमवारी सकाळपासूनच ‘ओ काट…’ चा सूर उमटत होता. बंदी असलेला जीवघेणा नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालविणाऱ्यांमध्ये दिवसभर नायलॉन मांजाची धास्ती होती. वाहतूक पोलिसांनी मात्र सतर्कता दाखवत रस्तोरस्ती फिरून झाडावर-खांबावर अडकलेला नायलॉन मांजा काढला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मकरसंक्रांतीनिमित्त शहरातील प्रत्येक घराच्या छतावर लहानांसह मोठ्यांचीही पतंग उडविण्यासाठी गर्दी होती. सकाळपासूनच आकाश रंगबेरंगी दिसत होते. अनेक जण पतंगबाजीचा आनंद लुटत होते. शासनाने बंदी घातलेला नायलॉन मांजा यावर्षी रस्त्यावर पडलेला दिसणार नाही, अशी अपेक्षा असताना पोलिसांच्या कारवाईत दम नसल्यामुळे नायलॉन मांजाचा सर्रास वापर करण्यात आला.

हेही वाचा…संक्रांतीच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी उसळी, असे आहेत आजचे दर…

वाहतूक पोलिसांनी मांजामुळे प्राणघातक घटना होऊ नये म्हणून सतर्कता दाखवली. शहरातील सर्वच उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. अजनी वाहतूक शाखेने जनजागृतीसाठी रस्त्यावर मोठमोठे फलक लावले. मात्र, ओ काट च्या नादात अनेक रस्त्यावरील झाडाला किंवा खांबावर नायलॉन मांजा अडकला होता. रामेश्वरी रोड, मानेवाडा रोड, तुकडोजी पुतळा रोड, सक्करदराकडे जाणारा रस्ता, वंजारीनगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी नायलॉन मांजा रस्त्यावर अडकलेला असल्याचे दिसून आले.

त्यामुळे पोलीस निरीक्षक रितेश अहेर यांनी लगेच आपल्या पथकासह स्वतः रस्त्यावरील झाडांवर अडकलेला मांजा काढला. परिसरातील अनेक रस्त्यावर फिरून नायलॉन मांजा जमा करीत विल्हेवाट लावली. वाहनचालक मांजामुळे जखमी होऊ नये म्हणून गळ्याला बांधायच्या कापडी पट्ट्यांचे वाटप केले. रिंग रोडवर ट्रकचालकांसाठी डोळे तपासणी शिबीराचे आयोजन केले.

हेही वाचा…नागपूर : धरमपेठकडे जायचे… घराबाहेर पडताना हे रस्ते टाळा, वाहतुक कोंडीत अडकण्याची शक्यता

तेथे प्रत्येक ट्रकचालकांचे निःशुल्क डोळे तपासून डॉक्टरांनी औषधोपचार आणि चष्माचे वाटप केले. भविष्यात वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत वचन वाहतूक पोलिसांनी चालकांकडून घेतले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nylon manja scare in sub capital nagpur the traffic police showed vigilance to prevent fatal incidents adk 83 psg
First published on: 15-01-2024 at 18:06 IST