अमरावती : महावितरणच्या अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील ४० हजारापेक्षा जास्त वीज ग्राहकांचा ४५ कोटी रूपयाच्या वीज बिलाच्या थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. परंतु ३७ हजारापेक्षा जास्त ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यास दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही या ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा केलेला नाही. ग्राहक विजेशिवाय कसा राहू शकतो याची खात्री करण्यासाठी विशेष पथकाच्या माध्यमातून या ग्राहकांची तपासणी करण्यात येणार आहे.

महावितरणकडून वारंवार विनंती, पाठपुरावा करण्यात आल्यानंतरही वीज ग्राहकांचा चालू अथवा थकीत बिल भरण्यात प्रतिसाद न मिळाल्याने अमरावती परिमंडळातील ४० हजार ७३७ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यांच्याकडे एकूण ४५ कोटी ८० लाख रूपयाचे बिल थकीत होते. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १३ हजार ३४३ ग्राहकाचा समावेश असून त्यांच्याकडे १२ कोटी ८० लाख रूपयाचे वीज बिल थकीत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील २७ हजार ३९४ ग्राहकांचा ३३ कोटी रूपयाच्या थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

वीज चोरी आढळल्यास होणार फौजदारी

विजेशिवाय जगण्याची कल्पना करणे, आजच्या घडीला शक्य नाही. असे असताना ग्राहक विजेशिवाय कसे राहू शकतात, याची माहिती जाणून घेण्यासाठी अशा ग्राहकांची तपासणी करण्यासाठी महावितरणने परिमंडळ कार्यालयांकडून विभागानुसार वेगवेगळी विशेष पथके कार्यरत केली आहेत. वाढलेल्या थकबाकीमुळे आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या महावितरणकडून वसूलीसाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आकस्मिक तपासणी दरम्यान वीज ग्राहकांकडे वीज पुरवठा सुरू असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर वीज कायदा २००३ अंतर्गत वीज चोरीच्या विविध कलमान्वये फौजदारी दाखल करण्यात येणार आहे.

शेजारधर्म पाळताना कायदा हातात घेऊ नये

अनधिकृत वीज देऊन शेजारधर्म पाळणाऱ्यांवरही विद्युत कायद्यांअंतर्गत वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शेजाऱ्यांनी आपण कायद्याचे उलंघन तर करत नाही ना ? याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले आहे.
वीज खंडित करूनही थकबाकी ही एक समस्या आहे, जिथे वीज वितरण कंपनीकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला जातो, पण असे असूनही, ग्राहकांकडून थकबाकी वसूल होत नाही किंवा ग्राहक अनधिकृतपणे वीजपुरवठा पुन्हा सुरू करतात. महावितरणकडून थकबाकी वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमा राबवल्या जात आहेत, परंतु थकबाकीदारांची संख्या आणि थकबाकीची रक्कम वाढत असल्याने ही एक गंभीर समस्या बनली आहे.