यवतमाळ : एकेकाळी राज्यस्तरीय स्वच्छता स्पर्धेत सलग दोनदा गौरवल्या गेलेले पांढरकवडा शहर आज प्रचंड कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संपूर्ण शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून मलेरिया व डेंग्यूच्या साथीने भीतीदायक परिस्थिती निर्माण केली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी शहरात फेरफटका मारला. कचरा गाडीवरील गाण्याचे विडंबन करत, ‘गाडीवाला नाही आया, कचरा सिओ को खिलाओ’ अशी टीका करत थेट प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

पांढरकवडा शहरात सध्या सर्वत्र घाणीचा विळखा आहे. नगर परिषद प्रशासन सुस्त असल्याने शहरात आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर किशोर तिवारी यांनी शहराचा फेरफटका मारला. शहरातील सफाई कामाचा ठेका खासदार संजय देशमुख यांच्याच नातलगाकडे असून, ठेका संपल्यानंतरही सहा सहा महिन्यांची मुदत वाढवल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे.

या कंत्राटदाराने सफाई कामगारांची संख्या १०२ वरून ३२ वर आणल्यामुळे शहरभर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दरम्यान, ठेकेदाराकडून सत्ताधारी नेत्यांना नियमित ‘कमिशन’ दिले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. कचऱ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत जून महिन्यापासून डेंग्यू-मलेरियाची साथ सुरू आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांच्यासह नागरिक मोठ्या प्रमाणावर आजारी पडले आहेत. स्थानिक दवाखाने रुग्णांनी फुल्ल झाले असून उपजिल्हा रुग्णालयातसुद्धा घाणीचे साम्राज्य असल्याने लोकांत संताप व्यक्त होत आहे.

तिवारी यांनी यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह स्थानिक भाजप आमदार राजू तोडसाम, भाजप नेते सोनू बोरले, तसेच कारवाईत अपयशी ठरल्याचा आरोप केला. शहरातील कचऱ्याचा प्रश्न गांभीर्याने सोडविण्याऐवजी काही नेते समाजमाध्यमांवर छायाचित्र टाकून व्हायरल करण्यात व्यस्त आहेत, अशी टीका तिवारी यांनी केली. दरम्यान, किशोर तिवारी यांची ‘गाडीवाला नही आया, कचरा सिओ को खिलाओ’, ही उपरोधिक टीका समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाली. पांढरकवडा शहरात या टीकेची ही चर्चा रंगली आहे. प्रशासनाने तातडीने कचरा व्यवस्थापन सुधारावे अशी मागणी नागरिकांनीही केली आहे.

पुढील आठवड्यापासून नवरासत्रोत्सव सुरू होत असून, या काळात रात्रीच्या वेळी भाविक मोठ्या संख्येने दुर्गादेवींचा देखावा पाहण्यासाठी घराबाहेर पडतात. यावेळी नवरात्रादरम्याने पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज असल्याने नगर परिषद प्रशासनाने शहरातील रस्त्यांवरील कचरा उचलण्याची मागणी केली आहे. तसेच शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचीही मागणी होत आहे.