यवतमाळ : बहुप्रतिक्षित वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे काम वर्धा ते कळंब या मार्गावर पूर्ण झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत या मार्गावर लोकसभा निवडणुकीपूर्वी रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन कामी लागले आहे. या मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याची चर्चा सुरू असताना आता रेल्वे मंडळाने वर्धा ते कळंब या मार्गावर पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेत तसे वेळापत्रकही प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचा >>> “विरोधकांनी शहाणपण शिकवण्याची गरज नाही,” चित्रा वाघ यांनी सुनावले; म्हणाल्या, “त्यांना केवळ देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा…”

विदर्भासह मराठवाड्याला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी गेल्या १५ वर्षांपासून या रेल्वेमार्ग प्रकल्पाचे काम सुरू आहे. हा महत्त्वाकांक्षी गेल्या पाच वर्षात मार्गी लागला आहे.  विशेष बाब म्हणून ६० टक्के केंद्र सरकार, तर ४० टक्के राज्य सरकारच्या निधीतून तयार होत असलेल्या या रेल्वे प्रकल्पाच्या कामाला गती आली आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड हा २८४.६५ किमीचा मार्ग आहे. यातील ३८.६१ किमीचा वर्धा ते कळंब हा मार्ग पूर्ण झाला असून, उर्वरित २४६.५ किमीच्या कळंब- नांदेड मागांचे काम वेगात सुरू आहे. या मार्गावरील ८० पैकी ३२ मोठया पुलांची कामे पूर्ण झाली आहेत, तर रोड ओव्हर बीजची ४३ कामे प्रगतिपथावर आहेत. या मार्गावर आठ किमी लांबीच्या सहा बोगद्यांचे कामही सुरू आहे. दरम्यान, पॅकेज-१ व २ अंतर्गत असणारी कामे पूर्णत्वास नेऊन मार्चअखेरपर्यंत यवतमाळपर्यंत रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ७५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> उपमुख्यमंत्र्यांचे स्वप्न अखेर पूर्ण, “बिबट सफारी” चा मार्ग मोकळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्धा-यवतमाळ-नांदेड मार्गावरील देवळी ते कळंब अशी २३.६९ किमी मार्गाची सुरक्षा चाचणी २३ डिसेंबरला यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. त्यानंतर रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनी या नवीन मार्गाची पाहणी करून मार्गाला सुरक्षा प्रमाणपत्र बहाल केले. त्यामुळे या मार्गावर प्रत्यक्ष रेल्वे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. या प्रक्रियेनंतर आता रेल्वे मंडळाने वर्धा ते कळंब या मार्गावर आठवड्यातून पाच दिवस गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे वेळापत्रकही जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार वर्धा-देवळी-भिडी-कळंब या रेल्वे स्टेशनदरम्यान पॅसेंजर रेल्वे सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ही गाडी रविवार व बुधवार वगळून आठवड्यातील पाच दिवस धावणार आहे. वर्धा येवून गाडी क्र. ५१११९ सकाळी ८ वाजता सुटेल. ती देवळी स्थानकावर ८:२७ ला येईल, त्यानंतर भिड़ी स्थानकावर ८:४२ तर कळंब रेल्वे स्थानकावर ती ९ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. त्याचप्रमाणे गाडी क्र., ५११२० ही कळंब येथून सकाळी १० वाजता सुटेल. १०:२० वाजता भिड़ी स्थानक, १०:३२ वाजता देवळी स्थानक, तर सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी ती वर्धा रेल्वे स्थानकावर पोहोचेल. ही रेल्वे गाडी लवकरच सुरू करण्याचे प्रयत्न असून, या रेल्वे गाडीला एकूण दहा कोच राहणार आहेत. यामध्ये जनरलचे आठ, तर एसएलआरचे दोन कोच राहणार आहे. ही पॅसेंजर रेल्वे सुरू झाल्यास कळंब, देवळी तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.