येथील जिल्हा पोलीस अधीक्षकांची गुरुवारी बदली केल्यानंतर गृह विभागाने १२ तासांतच आपला आदेश फिरवला. गुरुवारी महाराष्ट्र पोलीस अकादमीचे अधीक्षक गौरव सिंह यांची यवतमाळच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी रात्री उशिरा पवन बनसोड यांच्या नावाचे आदेश निघाले. गृह विभागाने यवतमाळ पोलीस अधीक्षक पदासाठी एका दिवसात तीन आदेश काढल्याने या प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चा आहे.

हेही वाचा- नागपूर: पुन्हा चार ‘स्वाईन फ्लू’ग्रस्तांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब

यवतमाळ येथे नियुक्ती करण्यात आलेले पवन बनसोड यांची गृह विभागाने गुरुवारी काढलेल्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण येथून सिंधुदुर्ग येथे बदली झाली होती. शुक्रवारी रात्री नव्याने काढलेल्या आदेशानुसार सिंधुदुर्ग येथून यवतमाळ येथे बदली करण्यात आली. दरम्यान शुक्रवारी दुपारी अपर पोलीस महासंचालकांनी तातडीचे आदेश काढून पुढील आदेशापर्यंत डॉ. दिलीप पाटील भुजबळ हेच यवतमाळचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळतील असे स्पष्ट केले होते. त्यानंतर रात्री नव्याने आदेश निघाल्याने पोलीस वर्तुळात विविध चर्चा आहे.

हेही वाचा- नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचाचे शक्तीप्रदर्शन; विविध प्राधिकरणांच्या लवकरच निवडणुका

राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाने गुरुवारी काढले. यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या जागेवर गौरव सिंह यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांच्या सहीने आदेश निघाला. यात गौरव सिंह यांच्यासह अन्य दोन अधिकारी वगळता इतरांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे व पदग्रहण अवधी न उपभोगता बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास सांगण्यात आले. याच आदेशात दिलीप पाटील भुजबळ हे पुढील आदेशापर्यंत यवतमाळ येथेच पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार पाहतील, असे स्पष्ट करण्यात आले होते.

हेही वाचा- नागपूर: शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच; कर्जमाफीसाठी पात्र, पण लाभ नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भुजबळ यांना पोलीस महानिरीक्षक म्हणून बढती देण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाकडून काही दिवसांपूर्वीच देण्यात आले आहे. मात्र गुरुवारच्या आदेशात डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येईल, असे नमूद आहे. भुजबळ यांच्या बढतीचे आदेश न आल्याने पोलीस वर्तुळात विविध चर्चा सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री पवन बनसोड यांची नियुक्ती करण्यात आल्याने भुजबळ यांना नवीन आदेशाची प्रतीक्षा आहे. बनसोड आज शनिवारी सायंकाळी पदभार स्वीकारणार आहेत.