scorecardresearch

पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड कऱ्हांडला अभयारण्य पर्यटकांसाठी खुले; असं करा ऑनलाईन सफारी बुकिंग

पर्यटकांसाठी १६ ऑक्टोबरपासून ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध करता राहणार आहे.

Pench, Bor Tiger Reserve and Umred Karhandla Sanctuary are open for tourists
पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड कऱ्हांडला अभयारण्य पर्यटकांसाठी खुले

पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प व उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील पर्यटन प्रवेशद्वारावरून एक ऑक्टोबरपासून पर्यटन सुरू करण्यात आले आहे. पर्यटकांना ऑनलाईन सफारी बुकिंगची सुविधा १६ ऑक्टोबरपासून उपलब्ध राहील.

हेही वाचा- शहरी भागांतील तापमानवाढ चिंताजनक; जगभरात ग्रामीण भागापेक्षा २९ टक्के अधिक वेग; चीनमधील संशोधकांचा अभ्यास

सफारीकरिता अनुकूल असलेले पर्यटन रस्ते व पावसाची स्थानिक परिस्थिती लक्षात घेता पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी प्रवेशद्वार, देवलापार प्रवेशद्वार, चोरबाहुली प्रवेशद्वार तसेच बोर व्याघ्र प्रकल्पातील बोरधरण पर्यटन प्रवेशद्वार आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील कऱ्हांडला व पवनी प्रवेशद्वार १५ ऑक्टोबरपर्यंत पर्यटकांकरिता ऑफलाईन पध्दतीने उपलब्ध राहणार आहे. तसेच प्रवेशद्वारावरील वाहन क्षमतेच्या मर्यादेत सफारी सुविधाही उपलब्ध आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पेंच व्याघ्र प्रकल्पात रस्त्याची परिस्थिती लक्षात घेऊन सद्यस्थितीत पर्यटन झोन सफारीकरिता उपलब्ध राहणार आहे.

हेही वाचा- गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

बोर व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात बोरधरण पर्यटन गेट येथे बोर जलाशयातील पाणी पर्यटन रस्त्यावर आले असल्याने पाण्याची पातळी कमी होईपर्यंत अडेगाव प्रवेशद्वार सुरू राहणार नाही. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील गोठणगाव पर्यटन झोन रस्ता सफारीकरिता अनुकूल नसल्यामुळे सद्यस्थितीत बंद राहील.

हेही वाचा- सावधान ! नरभक्षी सीटी १ वाघ देसाईगंज तालुक्यातील जंगलातच; जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश

पर्यटकांना ऑनलाईन सफारी बुकिंगची सुविधा १६ ऑक्टोबरपासून http://www.mahaecotourism.gov.in या संकेतस्थळावरून उपलब्ध राहील. अधिक माहितीसाठी क्षेत्र संचालक पेंच व्याघ्र प्रकल्प तसेच विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) बोर अभयारण्य कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५६०७२७/२५६०७४८, उपसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांचे कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०७१२-२८११९२१ यावर संपर्क साधावा, असे व्यवस्थापनाने कळवले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-10-2022 at 09:26 IST