नागपूर : पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वत: रस्त्यावर उतरले आहे. त्यांनी चक्क एका कुख्यात गुंडाला पकडले. मंगळवारला आयुक्तांना विना हेल्मेट व धोकादायक पद्धतीने वाहन पळविणाऱ्या एका युवकावर संशया आला. त्याला थांबविले. त्याच्या देहबोलीवरून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याबाबत संशय येताच त्याचा अभिलेख तपासला असता, तो कुख्यात गुंड असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीने पुन्हा डोके वर काढले असून, त्यामुळेच अलिकडच्या काळात खुनाच्या अनेक घटना घडल्यात. अशा परिस्थितीत गुन्हेगारांना वेळीच ठेचून काढण्यासाठी खुद्द पोलीस आयुक्तांनी शहरातील संवेदनशील भागांमध्ये भेटी देण्यास सुरुवात केली आहे. मोहसिन उर्फ गुड्डू अख्तर मोहम्मद जुल्फेकार अख्तर (रा. टेका, नयी बस्ती, पाचपावली) असे गुंडाचे नाव आहे.

हेही वाचा – नागपूर : पाच रस्ते, मेट्रोस्थानकामुळे अजनी चौक ‘अपघातप्रवण’! नीरीच्या नियोजित जागेवर मेट्रो स्थानक न बांधल्याचा फटका

हेही वाचा – नगर रचना विभागाची परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी, ‘या’ तारखेला होणार कागदपत्रांची पडताळणी

मंगळवारला शहर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल हे शहरातील विविध संवेदनशिल ठिकाणी भेट देऊन आपल्या कार्यालयात परत येत होते. यावेळी त्यांना सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकाशवानी चौक ते जीपीओ चौकादरम्यान (एमएच ४९ एक्स २५८९) क्रमांकाचा युवक हा विना हेल्मेट व धोकादायक पद्धतीने वाहन पळविताना निदर्शनास आला. आयुक्तांनी सदर वाहन चालकास रोखून त्याची विचारणा केली असता, त्याने त्याचे नाव मोहसिन उर्फ गुड्डू अख्तर मोहम्मद जुल्फेकार अख्तर असे सांगितले. एकूणच त्याच्या देहबोलीवरून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याबाबत प्रथमदर्शनी संशय आल्याने आयुक्तांनी पाचपावली पोलीस ठाण्यातून त्यााचा अभिलेख तपासला. त्यामध्ये त्याच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. त्यावरून तो गुन्हेगार असल्याचे निष्पन्न होताच, आयुक्तांनी तातडीने त्याला ताब्यात घेवून सीताबर्डी पोलिसांच्या स्वाधीन केले.