यवतमाळ : शहरातील रस्त्यांची दुरवस्था, शासकीय आरोग्य व्यवस्था आणि प्रशासनासह विविध शासकीय योजनांमधील अनागोंदी, निष्क्रीयते विरोधात समाज माध्यमातून आवाज उठवणाऱ्या युवकाविरुद्ध पोलिसांनी थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्त्याचा पोलिसांशी व प्रशासनाशी होत असलेल्या संघर्षातून पोलिसांनी जाणीवपूर्वक ही कारवाई केल्याचा आरोप होत आहे. या कारवाईनंतर जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातून निषेध व्यक्त होत आहे. रोहन दिलीप रामटेके, रा. पाटीपुरा यवतमाळ असे देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. रोहन रामटेके यांना न्याय मिळावा मागणीसाठी यवतमाळकर एकवटले आहेत. त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्याचा निषेध करत आज शुक्रवारी नागरिकांनी एकत्र येत जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत गृहमंत्री,महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात रोहन रामटेके यांच्यावर दाखल केलेला देशद्रोहाचा गुन्हा तत्काळ मागे घेण्यात यावा,अशी मागणी करण्यात आली असून या घटनेविरोधात शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. रोहन रामटेके हे गेल्या काही वर्षांपासून यवतमाळ शहर व जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था,आरोग्य यंत्रणेतील त्रुटी,शिक्षणातील दुर्लक्ष आणि प्रशासनातील उदासीनता या जनजीवनाशी निगडित प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आहेत. शाळांमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेसमोर मोर्चा काढला होता. या घटनेवरील सोशल मीडियावरील त्यांच्या भाष्याला देशद्रोह मानून पोलिसांनी केलेली कारवाई ही अवास्तव आणि चिंताजनक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
लोकशाही व्यवस्थेत लोकांचे प्रश्न मांडणे हा अपराध नसून तो नागरिकांचा संवैधानिक हक्क आहे. लोकांच्या प्रश्नांवर बोलणे, सरकारकडे जबाबदारीची मागणी करणे हे देशद्रोह नव्हे तर देशप्रेमाचे द्योतक आहे. त्यामुळे ही कारवाई अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याचे नागरिकांनी या निवेदनात म्हटले आहे. रोहन हे सध्या गोधनी रोडवरील जुन्या तहसील कार्यालयाजवळ इमिटेशन ज्वेलरीची टपरी लावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही त्यांनी लोकहितासाठी निडरपणे समाजमाध्यमांतून आवाज उठवला. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्यावर केलेली कारवाई अन्यायकारक असून, ती तत्काळ मागे घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. ही कारवाई सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज दबविण्याचा प्रयत्न असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
निवेदन देतेवेळी रोहन रामटेके यांचे वडील दिलीप रामटेके, पत्नी मनीषा रामटेके, बहीण पल्लवी रामटेके, तसेच लहान मुलगा आणि मुलगी यांच्यासह राजमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नितीन मिर्झापूरे, शहर काँग्रेस अध्यक्ष प्रा.डॉ.बबलू उर्फ अनिल देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ढोक, ऍड.जयसिंग चव्हाण, सचिन मनवर, शेतकरी आंदोलक प्रा.पंढरी पाठे आदी उपस्थित होते. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्याशी संपर्क केला असता, रोहन रामटेके यांनी चिथावणीखोर पोस्ट केली. नियमांचा पूर्ण अभ्यास करून त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला, असे सांगितले.
