गोंदिया : ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे संयुक्त पाऊल उचलले आहे. सामाजिक समारंभात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले होते. लग्न समारंभ, मिरवणुका आणि सामाजिक-धार्मिक कार्यक्रमांमध्ये कर्णकर्कश डिजे आवाजामुळे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणावर पोलिस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मिरवणूक मार्गावर आणि संवेदनशील ठिकाणी आवाजाच्या अतिरेकामुळे निर्माण होणाऱ्या गोंधळावर आळा घालण्यासाठी आमगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध ठिकाणी संयुक्त कारवाई राबविण्यात आली. या कारवाईत एकूण पाच अत्याधुनिक डीजे वाहने जप्त करण्यात आली असून, एकूण १,०९,०००/- चा दंड ठोठावण्यात आला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून आमगाव पोलीस ठाणे क्षेत्रात डीजे वाजवून गोंगाट करणाऱ्या वाहनांमुळे नागरिक हैराण झाले होते. या संबंधी लेखी तक्रार सुद्धा आमगाव पोलीस ठाण्यात दिली होती. तसेच गुरुवारी लग्न समारंभात डीजे वरील गाण्या वरून दोन गटांत वाद निर्माण झाल्याचे फोनवरून पोलिसांना कळले. वाहनांचे चक्क बदल करून, ठराविक उंची-रुंदी पलीकडे डीजे उपकरणे बसवण्यात आली होती. त्यामुळे सार्वजनिक रस्त्यांवर वाहतूक विस्कळीत होत होती. यावर आमगाव येथील नागरिकां कडून तोंडी आणि लेखी तक्रारी आणि ११२ आपत्कालीन हेल्प लाइनवर अनेक वेळा संपर्क करण्यात आला. या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी गांधी चौकात कारवाई करण्यासाठी सुरुवात केली .
पाच डिजे वाहने जप्त
दिनांक गुरूवार ८ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता, आमगाव पोलीस स्टेशनचे वाहतूक पथक गांधी चौक परिसरात पेट्रोलिंग करत असताना वाहन टाटा ४०७ क्रमांक (एमएच ३५ जीटी ७८५७) हे वाहन अत्याधुनिक स्वरूपात आढळले. डीजे बसविलेले या वाहनाच्या चालकाकडे कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याने वाहन जप्त करण्यात आले. त्याचप्रमाणे शुक्रवार ९ मे रोजी आयशर प्रो १०४९ वाहन क्रमांक एम एच ३६ एफ ३३०७ हे वाहन देखील ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर ०९ मे २०२५ रोजी आणखी तीन वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सीजी टी ५५९५, एमएच११ डीडी २१७० आणि एमएच३५ के. ३५१८ या तीन अत्याधुनिक डी जे बसविलेल्या वाहनांचा समावेश आहे. या सर्व वाहनांकडे ना डीजे साठी परवानगी होती ना आरटीओ चे प्रमाणपत्र. त्यामुळे त्यांनाही आमगाव पोलीस स्टेशनमध्ये जप्ती करण्यात आले आहे.
उप प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई
ई-चालानद्वारे १.०९ लाखांचा दंड : शुक्रवार ०९ मे रोजी, सहायक मोटार परिवहन निरीक्षक राजेंद्र दराडे आणि पंकज मल्लिकार्जुन आनंदपुरे यांनी आमगाव पोलीस ठाण्यात उपस्थित राहून नमूद पाचही वाहनांचे तांत्रिक तपासणी करून, मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई केली. या कारवाईअंतर्गत संबंधित वाहन चालक व मालकांवर एकूण १,०९,०००/- रुपयांचा दंड ई-चालानद्वारे आकारण्यात आला.
पोलीस प्रशासनाकडून जनतेस आवाहन
वर्षावर्ष पासून चालत येत असलेले पारंपरिक वाद्यांचा वापर करा, कर्णकर्कश ध्वनीप्रदूषण टाळा : उपपोलीस अधीक्षक प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमगाव ठाण्याचे पोलिस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या नेतृत्वात ही कारवाई राबविण्यात आली. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर करून आवाजाचा त्रास टाळावा. कायद्याचे पालन करणे आणि शांतता राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, असे ही आवाहन करत स्पष्ट करण्यात आले आहे.