बुलढाणा : लोकसभा निवडणूक ही महत्त्वाच्या टप्प्यावर आली असून देशात पुढे काय काय घडणार, हे निश्चित सांगता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणात अगदी बेंबीच्या देठापासून बाबासाहेब पुन्हा आले तरी देशाचे संविधान बदलणार नाही, असा सांगत आहेत. हा मोदींचा ‘जुमला’ आहे. त्यांनी आधी संविधानाबदलची आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. देश संक्रमनातून जात असून समान व्यवस्थेचे आव्हान देशासमोर उभे ठाकले आहे, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार वसंत मगर यांच्या प्रचारार्थ चिखलीतील राजा टॉवर येथे आयोजित सभेत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काँग्रेसवर टीकेची तोफ डागली. मोदी आणि संघावर संविधान बदलतील, असा आरोप केला जात आहे. त्याला जनतेने बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. गल्लीतला दादा आणि दिल्लीतला दादा यात फरक काय, असा सवाल करून देशाला दादागिरी करणारा नव्हे माणुसकी जपणारा पंतप्रधान हवा, असे प्रतिपादन अ‍ॅड. आंबेडकर यांनी केले. पंतप्रधान मोदींनी संविधान बदलणार की नाही, हे अगोदर स्पष्ट करावे.

हेही वाचा…कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा महायुतीला फटका, किशोर तिवारींचा दावा,’ ३० जागांवर…’

जोपर्यंत याबाबत मोदी ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत ते आपण सर्वांना फसवताहेत. मोदी असे का बोलताहेत, याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे यजमान प्रभाकरन यांनी दिलेली मुलाखत सर्वांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. त्यांनी सांगितले आहे की, मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास या देशाचे संविधान बदलले जाईल. गोध्रा व मणिपूरमध्ये जे घडले, तसे जागोजागी घडू शकते. याबाबत जनतेला सावध करण्याचा प्रयत्न आपण करीत आहे. मोदी सत्तेत आल्यास देशाचा नकाशा नक्कीच बदलणार आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले.

काँग्रेसचे किती उमेदवार निवडून येतील?

शिवसेना व काँग्रेस कार्यकर्त्यांना या जुलमी सरकारला धडा शिकवण्याची संधी आहे. दुर्देवाने काँग्रेसने शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र काँग्रेसचे किती उमेदवार निवडून येतील हा मोठा प्रश्न आहे. देशातील ५० कोटींपेक्षा जास्त संपत्ती असणाऱ्या १७ लाख हिंदू कुटुंबानी देशच नव्हे तर नागरिकत्व देखील सोडल्याचा पुनरुच्चार आंबेडकरांनी या सभेत केला. जगातील सर्व हिंदू नागरिकांना प्रतिनिधीत्व देण्याच्या गप्पा मारल्या जात आहेत, असे सरकार आपल्याला पाहिजे का, याबाबत विचार करण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे, असे आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा…गोंदिया : ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण; मतदान प्रक्रिया दोन तास बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इलेक्ट्रॉल बॉण्ड मोठा घोटाळा

भाजप सरकारने इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून मोठा घोटाळा केला असून त्याबाबतची माहिती जाहीर करावी, असे आवाहन त्यांनी केले. या माध्यमातून मोदी दादागिरी करून वसुली करणारा दादा म्हणजे गल्लीतला दादा व दिल्लीतला दादा सारखेच झाले आहे. ईडी व इतर वित्तीय संस्थांचा गैरवापर करून तब्बल १३ हजार कोटी रूपये यांनी मिळवले आहेत. बोर्फार्स प्रकरणाची आठवण करून देत १३५ राफेल विमान खरेदी करण्याचा करार रद्द करून केवळ ३५ विमाने अंबानीकडून घेतली आहेत. उरलेली विमाने कुठे तयार करणार? हे अंबानीने अद्यापपर्यंत स्पष्ट केले नाही. केंद्रातील सरकार शेतकर्‍यांच्या मूळावर उठले असून यांची सत्तेबाहेर जाण्याची वेळ आल्याचा दावा, अॅड आंबेडकर यांनी यावेळी केला.