लोकसत्ता टीम

बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका कायमच आहे. आज भरधाव ट्रॅव्हल्सने मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिल्याने दोघे जण गंभीर झाले. जखमींमध्ये बसचालक आणि वाहक यांचा समावेश असून त्यांच्यावर बीबी (ता. लोणार) येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

नागपूर कॉरिडोवरील चॅनल नंबर ३१८ वर पुसदकडे जाणाऱ्या अंबारी कंपनीच्या ट्रॅव्हल्सने रायपूर, छत्तीसगडकडे जाणाऱ्या ट्रकला मागून जबर धडक दिली. या अपघातात ट्रकचालकासह वाहक गंभीर जखमी झाला. अपघातात खासगी बसची प्रचंड मोडतोड झाली.

आणखी वाचा-महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? पटोलेंच्या दाव्यावर अनिल देशमुख म्हणाले, “तकलादू…”

नागपूर ते मुंबईदरम्यानचा हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आणि वाहन अपघात हे समीकरणच तयार झाले आहे. आजच्या अपघाताने ही दुर्दैवी मालिका कायम असल्याचे चित्र आहे. आज सकाळी नागपूर कोरिडॉरवरील चॅनल क्रमांक ३१८ वर दुसरबीड टोलनाक्याजवळील केशव शिवणी फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. वरिष्ठ सुत्रानूसार, अंबारी कंपनीची ट्रॅव्हल्स (क्र. एमएच ३७ टी ८०००) पुणे येथून पुसदकडे जात होती. बसमध्ये २० प्रवासी प्रवास करीत होते. बस समोर धावणारे मालवाहू वाहन (क्र. सीजी ०७ बीई ८५२१) छत्रपती संभाजीनगरवरून रायपूरकडे (छत्तीसगड) जात होते.

दरम्यान, घटनास्थळी बसचालक महादेव मोतीराम राऊत (३५, जि. यवतमाळ) याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे नागपूर कॉरिडोवरील चॅनल नंबर ३१८ वर ट्रॅव्हल्सने समोर असलेल्या ट्रकला भरवेगात जबर धडक दिली. या अपघातात बस चालक महादेव मोतीराम राऊत (रा. पुसद) हा गंभीर जखमी, तर वाहक ज्ञानेश्वर वानखेडे जखमी झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रॅव्हल्सचा समोरील भाग अक्षरश चक्काचूर झाला.

आणखी वाचा-नागपूर मेट्रोचे तिकीट आता व्हॉट्सअ‍ॅपवर! गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक अर्धा-एक तास ठप्प पडली होती. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र राऊत, पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांच्यासह सुरक्षा रक्षक दलातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या पथकाने जखमी चालक आणि वाहक याना सोबतच्या रुग्णवाहिकेने बिबी (ता. लोणार) येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतुक सुरळीत केली. त्यानंतर अपघाताची माहिती किनगावराजा पोलिसांना देण्यात आली. पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून तपास सुरू केला आहे. दोन्ही जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे ग्रामीण रुग्णालय सूत्रांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुन्हा डुलकी!

ट्रॅव्हल्समधील वीस प्रवासी साखरझोपेत असताना हा अपघात झाला. त्यामुळे अपघात नेमका कसा आणि कशामुळे झाला याचे कारण अस्पष्ट आहे. मात्र, पुरेशी झोप न झाल्याने चालकाला डुलकी लागल्याने बसची समोरील वाहनाला धडक बसली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.