राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता

नागपूर : शासकीय यंत्रणेद्वारे कामे न करता प्रशासकीय यंत्रणा आणि जनता यांच्यामध्ये ती कामे खासगी कंपनी किंवा संस्था (एजन्सी) कडून करवून घेण्याचे प्रकार सर्व शासकीय खात्यामध्ये वाढले आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) देखील तोच कित्ता गिरवत त्यांची घरे विकण्यासाठी नागपुरातील एक खासगी कंपनी नेमली आहे. या कंपनीचा म्हाडात शिरकाव होताच सहा महिन्यात घरांच्या किंमती लाखो रुपयांनी वाढल्या आहेत.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत (म्हाडा) गरजू नागरिकांना परवडणारी घरे मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावीत, सरकारी जमिनी विकसित करून सदनिकांची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. नागपुरात नारी, शांतीनगर, डिगडोह, दवालामेटी, सुराबर्डी, वडधामना, वांजरा, बेलतरोडी आणि चंद्रपूर येथे तादाळा या भागात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (आर्थिक कमकुवत घटक) तसेच लघु उत्पन्न, मध्यम उत्पन्न गटासाठी घरे बांधण्यात आली आहेत. ही घरे विकण्याची जाहिरात दोन-तीनदा देण्यात आली. परंतु सर्व घरे विकल्या गेली नाहीत. घरे विकली नसल्याने म्हाडाने गुंतवलेली रक्कम अडकवून पडली आहे. म्हणून म्हाडाने खासगी संस्था नेमून घरे विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नागपूर म्हाडाने प्राधिकरणाची मंजुरी घेतली आणि नागपुरात एका खासगी संस्थेला काम दिले. ही संस्था म्हाडाला घर विकण्यासाठी मदत करीत आहे. या संस्थेला संबंधित ग्राहकांशी संपर्क साधणे, आवश्यक सर्व कागदपत्रे मिळवणे आणि कर्ज उपलब्ध करण्याची प्रक्रिया करून देण्याचे काम आहे. त्याचा मोबदला म्हाडा या एजन्सीला देत आहे. ही एजन्सी घर खरेदी करण्यासाठी अर्ज करणाऱ्यांना भ्रमणध्वनी संपर्क साधण्याची सूचना करते. त्यानंतर संबंधित ग्राहकाला आपल्या कार्यालयात बोलावून घेत आहे. पण, घर खरेदी करू इच्छिणाऱ्या काही ग्राहकांनी गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी एक ते चार लाख रुपयांपर्यंत किमती वाढवण्यात आल्याची तक्रार केली आहे.

आणखी वाचा-राज्यातील विविध पक्षीय युवा आमदारांना वेल्स विद्यापीठाचे निमंत्रण

दरम्यान, बांधकाम कंत्राटदारांशी झालेला करार आणि म्हाडाने निश्चित केलेले दर वारंवार बदलले जाऊ शकत नाहीत. कंत्राटदाराने बांधकामाला विलंब केल्यास किंवा प्रशाकीय अडचणीमुळे विलंब झाला तरी निश्चित झालेल्या किंमतीवर घर विक्री केली जाऊ शकत नाही, असे म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले.

दीड लाखाने किंमत वाढली

शांतीनगर इडब्ल्यूएस योजनेत ४५९.५६ चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिकेची अंतिम किंमत १२ लाख ४८ हजार रुपये आणि म्हाडा शुल्क एक लाख रुपये अशी एकूण किंमत १३ लाख ४८ हजार रुपये होती. आता या सदनिकेची किंमत १५ लाख रुपये असल्याचे खासगी एजन्सीने तयार केलेल्या पत्रकातून दिसत आहे.

घरांची किंमत वाढली नाही

घर खरेदी करणाऱ्यांना मदत व्हावी म्हणून म्हाडाने खासगी एजन्सी नेमली आहे. त्यासाठी म्हाडा त्यांना प्रत्येक घरामागे दहा हजार रुपये मोबदला देते. पण, म्हाडाच्या घराच्या किंमती वाढवण्यात आल्या नाही. मागच्या वर्षी जी किंमत होती, तिच किंमत आताही आहे. म्हाडाची घरे बांधून दोन-तीन वर्षे झाली आहेत. घर खरेदी करणाऱ्याला त्यात रंगरंगोटी किंवा डागडूजी करायची असेल तर काही रक्कम आकारून एजन्सी ती कामे करू देऊ शकते. परंतु, ग्राहकाला एजन्सीकडून ते काम करून घेणे बंधनकारक नाही. तसेच एजन्सीही त्यासाठी दबाव टाकू शकत नाही. -महेशकुमार मेघमाळे, मुख्य अधिकारी, म्हाडा.