नागपूर : राज्यातील ३३ जिल्ह्यांत एक लाख ७८ हजार ७२ गोवर्गीय जनावरे लम्पी रोगाने बाधित झाले होते. मात्र वेळेत १०० टक्के लसीकरण केल्याने पशुधनाचा मृत्यू कमी झाला आहे. सप्टेंबर २०२३ पर्यंत लसीकरणात महाराष्ट्र स्वयंपूर्ण होणार असून राज्यात ही लस तयार होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधान परिषदेत दिली. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना विखे पाटील म्हणाले, राज्य शासनाने १०० टक्के लसीकरण गतीने केल्याने पशुधनाचा मृत्यूदर कमी झाला. पशुपालकाचे नुकसान होऊ नये यासाठी कायमस्वरूपी मदत व्हावी म्हणून सर्व जनावरांसाठी व्यापक स्वरूपात विमा योजना सुरू करण्याचा विचार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पशुरुग्णालयातील रिक्त जागा दोन महिन्यांत भरणार

आतापर्यंत तीन हजार ३८३.८५ लाख रुपयांचा निधी पशुपालकांना वाटप केला आहे. उर्वरित पशुपालकांना १५ दिवसात मदत देण्यात येईल. शिवाय पशू रुग्णालयातील रिक्त जागा येत्या दोन महिन्यांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील, असेही विखे-पाटील यांनी सांगितले.

शेळय़ामेंढय़ांची लस गाईम्हशींना

लम्पीसाठी लसच नाही. जी वापरली जात आहे, ती शेळीवर्गीय प्राण्यांसाठी आहे. शेळय़ामेंढय़ांची लस गाईम्हशींना दिली जात आहे, असे या वेळी एकनाथ खडसे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Production vaccine lumpy in the state death maharashtra radhakrishna patil statement ysh
First published on: 28-12-2022 at 00:02 IST