लोकसत्ता टीम

नागपूर : जवळपास ३०० कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या वादातून एका वृद्धाची सुपारी देऊन हत्या करण्यात आली. वृद्धाला कारने धडक देऊन अपघाताचा बनाव करण्यात आला. मृतकाच्या चुलत भावाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या प्रकरणात मृतकाच्या सुनेनेच सुपारी दिल्याची बाब समोर आली आहे. तिने ड्रायव्हरच्या मदतीने हा प्रकार घडवून आणला असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. अर्चना पुट्टेवार असे तिचे नाव असून ती सरकारी अधिकारी आहे. पोलिसांनी तिला अटक केली आहे.

पुरुषोत्तम पुट्टेवार (८२, शुभनगर, मानेवाडा) यांचा २२ मे रोजी मानेवाडा चौकाजवळ कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यांची ३०० कोटींची वडिलोपार्जित मालमत्ता आहे. त्यांच्या कुटुंबात पत्नी शकुंतला, मुलगा डॉ.मनिष, सून व मुलगी आहे. पुट्टेवार यांच्या पत्नीचे ऑपरेशन झाले असल्याने डॉक्टर असलेल्या मुलाने त्यांना दवाखान्यात ठेवले होते.पुट्टेवार २२ मे रोजी तेथून मुलीच्या घरी जात असताना कारच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. अजनी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

आणखी वाचा-थरार! शेतकऱ्याचा हल्ला अन् चवताळलेल्या बिबट्याकडून पाठलाग…

दरम्यान, पुट्टेवार यांच्या चुलत भावाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांची हत्या झाल्याची भीती व्यक्त केली. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना केल्या. त्याआधारे तपास युनिट-४ कडे सोपवण्यात आला. पोलिसांच्या चौकशीत त्यांच्या घरातील कार चालक सार्थक बागडे याची भूमिका संशयास्पद आढळून आली. या दिशेने चौकशी केली असता सचिन धार्मिक आणि नीरज निमजे ऊर्फ नाईंटी यांची नावे समोर आली.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारणा केली असता सार्थक बागडे याच्या सांगण्यावरून त्याने पुत्तेवारची हत्या केल्याची कबुली दिली. सार्थकच्या सांगण्यावरून त्याने मोक्षधाम घाटातील ऑटोमोबाइल फर्मकडून जुनी कार खरेदी केली. या कारने पुट्टेवार यांना धडक देण्यात आली होती. पुट्टेवारच्या अगदी जवळच्या लोकांनी त्याला हत्येचे कंत्राट दिल्याचा संशय होता.

आणखी वाचा-संघ पदाधिकाऱ्यांबरोबर फडणवीसांची चर्चा; चर्चेनंतर लगेच दिल्लीकडे रवाना

आरोपींनी हत्येसाठी खरेदी केली कार

पुट्टेवार यांच्या हत्येसाठी आरोपींनी १.६० लाख रुपयांत जुनी कार खरेदी केली होती. सार्थकने नीरजला १.२० लाख रुपये, तर सचिनने ४० हजार रुपये दिले होते. सार्थक व नीरज कारमध्ये असताना सचिन दुचाकीने पोहोचला. आरोपींनी कार व दुचाकीतून पुट्टेवार यांच्या ई-रिक्षाचा पाठलाग केला. ते खाली उतरल्यावर नीरजने त्यांना कारला उडविले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असा रचला प्लॅन

सचिन धार्मिकने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने अर्चनाचे नाव घेतले. सचिनचे वडील बीसी चालवितात. अर्चना त्यांच्या बीसीची सदस्य आहे. तिला ड्रायव्हरची आवश्यकता होती. तिने सचिनच्या वडिलांना विचारणा केली. सचिनची सार्थकसोबत मैत्री आहे. त्याने त्याची डॉ.मनिष यांच्याकडे नोकरी लावून दिली. अर्चनाने सचिनला पुत्तेवारच्या हत्येची सुपारी दिली. तिने सार्थकचे नाव काहीही झाले तरी समोर यायला नको असे स्पष्ट सांगितले होते. सहा महिन्यांपासून अर्चना व आरोपी पुत्तेवार यांच्या हत्येची संधी शोधत होते.