नागपूर: ‘हैदराबाद गॅझेटीयर’वरून सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात नवा शासन आदेश काढला होता. यामध्ये राज्यात हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची मराठा समाजाची मागणी मंजूर करण्यात आली होती. मात्र, यानंतर महाराष्ट्रातील ओबीसी समाज आक्रमक झाला. १० ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या शहरात एक लाख लोकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. तर दुसरीकडे ‘हैदराबाद गॅझेटीयर’च्या आधारावर बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची समाजाची मागणी सुरू झाली आहे.
जर ‘हैदराबाद गॅझेटीयर’च्या आधारावर मराठा समाजाला ‘कुणबी प्रमाणपत्र’ मिळत असेल तर त्याच गॅझेटीयरमध्ये ‘आदिवासी’ उल्लेख असलेल्या बंजारा समाजावर अन्याय का?, असा प्रश्न बंजारा समाजाकडून उपस्थित करण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाकडून सरकारला आदिवासीतून आरक्षणासाठीचे निवेदन सरकारला पाठवण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्यात नागपूरमध्ये शुक्रवारी बंजारा समाजाकडून यासाठी आंदोलन करण्यात आले. यामुळे सरकारच्या अडचणी वाढणार आहे.
ओबीसी समाजाचा आरोप काय?
मराठा समाजाला मागच्या दाराने कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या शासकीय धोरणामुळे ओबीसी समाजावर मोठा अन्याय होत आहे. ओबीसींची लोकसंख्या ५४ टक्क्यांपेक्षा जास्त असतानाही त्यांना केवळ तुटपुंजे आरक्षण दिले जाते. शासनाच्या या धोरणांमुळे ओबीसी विद्यार्थ्यांचे शिक्षण, तरुणांच्या नोकरीच्या संधी आणि समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वावर थेट परिणाम होणार आहे. या अन्यायाविरोधात संपूर्ण समाजमन पेटून उठले असून, शासनाला या धोरणांचा फेरविचार करण्यास भाग पाडण्यासाठी एक विराट महामोर्चा आयोजित केला आहे. हैदराबाद गॅजेटमुळे मराठा समाजाचा ओबीसींमध्ये सहभाग वाढणार असल्याने ओबीसी आक्रमक झाले आहे. शासन निर्णय रद्द करण्याची मागणी होत आहे.
बंजारा समाज आक्रमक
हैदराबाद गॅझेटच्या आधारावर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याचा निर्णय झाल्यानंतर आता बंजारा समाजसुद्धा पेटून उठला आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज हा आदिवासी समाज असल्याची नोंद असल्यामुळे नागपूरमध्ये बंजारा समाजातील सर्व संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून हैदराबाद गॅझेटच्या धर्तीवर महाराष्ट्रातील गोर बंजाराला एसटी ( अनुसूचित जमाती) प्रवर्गात सामावून घेण्याची मागणी केली. जिल्ह्यातील बंजारा समाजाने आज शुक्रवारी संविधान चौकात ‘उठ बंजारा जागा हो, एसटी आरक्षणाचा धागा हो’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.