वाशिम : बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर गत दोन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाचे आगमन झाले आहे. कुठे रिमझिम तर कुठे चांगला पाऊस झाला. रात्री जिल्ह्यात अनेक भागांत पाऊस झाला. आज ८ सप्टेंबर रोजी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. सर्वत्र ढगाळ वातावरण असून कोमेजलेल्या पिकांना संजीवनी मिळाली असली तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

जवळपास एक महिना उशिराने जिल्ह्यात मान्सून पावसाचे आगमन झाले होते. जुलै महिन्यात पिकाची वाढ समाधानकारक झाली होती. परंतु पिके परिपक्व होण्याच्या काळात पावसाचा मोठा खंड पडल्याने पिकांनी माना टाकल्या होत्या. पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात आला होता. मात्र दोन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागांत माध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरूच असल्याने पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा – मराठ्यांचा सरसकट ओबिसीत समावेश करू नये, अन्यथा…; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते डॉ. अशोक जीवतोडेंचा इशारा

हेही वाचा – VIDEO: दहीहंडी उत्सवाला गालबोट! गॅलरी कोसळून एकीचा मृत्यू, एक गंभीर

जिल्ह्यातील वाशिम, रिसोड आणि मालेगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे अनेक प्रकल्पांतदेखील पाणीसाठा कमीच आहे. पावसाच्या सरासरीचा विचार करता अद्यापही २१ टक्के तूट असून दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.