नागपूर : विदर्भात मुसळधार पावसाचे थैमान सुरूच आह़े हिंगणा तालुक्यात मुसळधार पावसामुळे पुरात मायलेकी वाहून गेल्याच्या घटनेला २४ तास होत नाहीत तोच सावनेर तालुक्यात वाहनासह सात जण वाहून गेले. त्यात एका दहा वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. विदर्भात या मोसमातील पूरबळींची संख्या आता २७ वर गेली आहे.
विदर्भात गेल्या आठवडय़ाभरापासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. नागपूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी आहे. त्यामुळे अनेक नदीनाल्यांना पूर आला आहे. रविवारी रात्री हिंगणा तालुक्यातील इसासनी परिसरातील नाल्याच्या पुरात मायलेकी वाहून गेल्या. मंगळवारी सावनेर तालुक्यात सात जण एका वाहनासह वाहून गेले. तालुक्यातील नांदागोमुख-छत्रापूर मार्गावरील छोटय़ा पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना चालकाने पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. काही मीटर पुढे जाताच सातही जणांसह वाहन बुडाले. यात तीन महिला, दोन पुरुष, एक दहा वर्षांचा मुलगा व वाहनचालकाचा समावेश आहे. हे सर्वजण मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई तालुक्यातील रहिवाशी होते. यातील तिघांचे मृतदेह सापडले आहेत.
इरई धरणाचे दरवाजे उघडले
चंद्रपूर जिल्ह्यातही शिरणा नदीला पूर आल्यामुळे माजरी-भद्रावती मार्ग, माजरी-पळसगाव मार्ग तसेच कोंढा नाल्याला पूर आल्यामुळे माजरी-कोंढा मार्ग व माजरी-देऊळवाडा मार्ग बंद करण्यात आला आहे. जिल्ह्यातील इरई धरणाचे तीन दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत.
सायखेडा धरणही भरले
यवतमाळ जिल्ह्यातही सोमवारी दिवसभर विश्रांतीनंतर रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सायखेडा धरण भरून वाहू लागले आहे. अतिवृष्टीमुळे सुमारे ५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
१२ गावांतील नागरिकांना घरे रिकामी करण्याची सूचना
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन या तालुक्यातील १२ गावांतील नागरिकांना घरे रिकामी करण्याचे आवाहन प्रशासनाने केल़े या गावांमध्ये सिरोंचा रै (छोटा बाजार), सूर्यरापल्ली (सिरोंचा माल), मंडलापूर, मद्दिकुंठा, जानमपल्ली वे, मृदुक्रिष्णपूर, आयपेठा रै, सोमनूर माल, नडिकुडा, कोत्तुर रै, असरअल्ली, अंकिसा, कंबालपेठा या गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील आलापल्ली येथेही ढगफुटीसदृश स्थिती निर्माण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून १०९ कुटुंबांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अहेरीतील मुसळधार पावसामुळे दिना नदी दुथडी भरून वाहत असून बोरी आलापल्ली मुक्तापूर येथे रस्ता खचल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे.