उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात गेल्या आठवड्यापासून मोसमी पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात भीमनगर इसासनीमधील नाल्याच्या पुरात महिला आणि त्यांची १७ वर्षांची मुलगी पुरात वाहून गेली. महिलेचा मृतदेह सापडला असून मुलीचा शोध सुरू आहे. सुकवण म्हात्रे असे मृत आईचे, तर अंजली म्हात्रे असे मुलीचे नाव आहे.
अमरावती जिल्ह्यात पूरस्थिती; युवक नदीत वाहून गेला
याशिवाय विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, पूरस्थिती उद्भवली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी गडचिरोलीला पोहचणार आहेत. तर, हवामान खात्याने येत्या १४ जुलैपर्यंत संपूर्ण विदर्भात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा –
नागपूर शहरात सलग पाचव्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. ग्रामीण भागातील नदीनाल्यांवर पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा, धामणगाव रेल्वे आणि चिखलदरा तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तीन दिवसांपूर्वी उद्भवोली पूरस्थिती आता ओसरत आहे. अकोला, बुलढाणा, वाशीम या जिल्ह्यात पावसाची तीव्रता कमी आहे. गोंदिया जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. नदीनाल्याकाठील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातही दूपारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पूरस्थिती कायम आहे, तर गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली-भामरागड हा मार्ग पूर्ववत सुरू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही इरई धरण भरत आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारनंतर गडचिरोलीच्या दौऱ्यावर आले. ते पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.