नागपूर: अंधश्रद्धा, जातिभेद आणि अवास्तव खर्च टाळणारी ही विवाहपद्धत, समाजसुधारणेच्या दिशेने उचललेले एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी या पद्धतीचा पाया घातला आणि स्त्री-पुरुष समानतेच्या मूल्यांना बळ दिले.
राजू केंद्रे हे महाराष्ट्रातील तरुण सामाजिक कार्यकर्ते आहेत. रविवारी राजू केंद्रे आणि भारती यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह पार पडला. समाजातील रूढी परंपरा चालीरीती यांना छेद देत त्यांनी हा विवाह केला. या सोहळ्याला महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित झाले होते. हा आगळावेगळा विवाह सोहळा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. सोबतच राजू आणि भरती यांनी सत्यशोधक विवाहाच्या माध्यमातून अनेकांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
काय आहे सत्यशोधक विवाह?
सत्यशोधक विवाहातून कोणताही धार्मिक विधी, मंत्रपठण, ब्राह्मण वर्चस्व किंवा हुंडा नसतो. वधू-वर एकमेकांच्या समोर उभे राहून, प्रेम, सहजीवन, जबाबदारी आणि महात्मा जोतिराव फुले यांनी तयार केलेल्या समतेच्या मंगलाष्टक म्हणतात.हुंड्याला ठाम नकारसत्यशोधक समाजाची लग्न परंपरा हा हूंडाविरोधी चळवळीचा मजबूत भाग ठरली आहे. या विवाहात हुंडा घेणे किंवा देणे पूर्णतः निषिद्ध आहे. दोन्ही कुटुंबांतही याचे पालन होत असल्याने अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक दडपणाविना लग्न लावणे शक्य होते.
राजू केंद्रे कोण आहेत
राजू मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. ग्रामीण आदिवासी भागातील पहिल्या पिढीतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी ते काम करत आहेत. त्यांनी या कामासाठी ‘एकलव्य’ ही शैक्षणिक चळवळ सुरू केली आहे. फोर्ब्स इंडिया व हिंदुस्तान टाइम्सच्या सामाजिक श्रेत्र या विभागामध्ये भारतातील तिशीच्या आतील तीस ‘प्रभावी तरुण व्यक्तिमत्त्वांच्या’ यादीत त्यांचा समावेश केला आहे.
राजु यांनी एसओएएस, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे ब्रिटिश सरकारच्या चेवनिंग स्कॉलरशिप वर एमएससी डेव्हलपमेंट स्टडीज पूर्ण केले. राजू केंद्रे स्वीडिश इन्स्टिट्यूट (स्वीडन) येथील फेलो सुद्धा आहेत. ग्लोबल गव्हर्नन्स मध्ये ग्लोबल अकॅडमी, बॉन (जर्मनी) कडून लीडरशिप फेलोशिप देखील देण्यात आली आहे. याशिवाय त्यांनी सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ येथे त्यांनी दोन वर्ष सहाय्यक प्राध्यापक म्हणून पण काम केले आहे, समाजकार्य विषयात ते नेट सेट आहे.
ग्रामीण आदिवासी भागातील पहिल्या पिढीतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी ते काम करत आहेत. त्यांनी या कामासाठी ‘एकलव्य इंडिया’ ही शैक्षणिक चळवळ सुरू केली आहे. एकलव्यच्या माध्यमातून त्यांनी आजवर ७०० हून अधिक युवकांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळवून दिली आहे. सोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात २०००० हजार विद्यार्थ्यांपर्यंत एकलव्य उच्च शिक्षणाच्या संधी घेऊन गेले आहे. नुकतंच कारगिल मध्ये पण त्यांनी काम हाती घेतलं आहे.
जागतिक दर्जाच्या स्कॉलरशिपमध्ये वंचित घटकातील प्रतिनिधित्व कमी असल्याचं अनुभवल्याने त्यांनी लंडन मध्ये असताना ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅम सुरू केला आहे, त्या माध्यमातून ते शंभर पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना वर्षभराची ट्रेनिंग देण्यात येते. पुढच्या एका दशकात किमान २००० जागतिक ग्लोबल स्कॉलर्स घडवण्याचं त्यांचं ध्येय आहे.