चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी राजुराचे आमदार सुभाष धोटे यांची नियुक्ती लोकसत्ता टीम चंद्रपूर: राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर दिल्लीत खासगी रुग्णालयात असताना पक्षातील त्यांचे विरोधक सक्रिय झाले आहेत. याच सक्रियतेतून शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडील काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार काढून चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्षपदी (ग्रामीण) राजुराचे आमदार सुभाष धोटे यांची नियुक्त केली आहे. बाजार समिती निवडणुकीत ग्रामीण काँग्रेसचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यासोबत विजयी नृत्य केले होते. बाजार समिती निवडणुकीत भाजप जिल्हाध्यक्षांशी हातमिळवणी केली म्हणून खासदार धानोरकर गटाने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यानंतर देवतळे यांना पदमुक्त करून त्यांचे पदाचा प्रभार शहर अध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडे सोपविण्यात आला. हेही वाचा. नागपुरातील गिर्यारोहकांची उत्तुंग कामगिरी; १३,८०० फूट उंच ‘पठालसू’ शिखर सर दरम्यान चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत गोळीबार प्रकरणानंतर या जिल्ह्यात माजी मंत्री विजय वडेट्टीवार व खासदार बाळू धानोरकर असा दोन पडले. वडेट्टीवार व राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी नुकताच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुढाकारातून सहकार मेळावा व नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचा सत्कार सोहळा घेतला होता. या सत्कार सोहळ्यात धानोरकर यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका करण्यात आली होती.