नागपूर: लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार आहे. त्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंच्या पक्षांची युती आणि राज ठाकरे यांचा महाविकास आघाडीत प्रवेशाबाबत काय होणार?  याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेसोबत आल्यानेच आमचा पराभव झाल्याचा दावा केला आहे. रामदास आठवले नेमके काय म्हणाले? आपण जाणून घेऊ या.

केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले हे नागपूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी माध्यमांशी रविभवन येथे संवाद साधला. यावेळी रामदास आठवले यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. रामदास आठवले  म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्रपणे लढेल अशी शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडेल.   लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे महायुतीसोबत आले, पण त्यातून अपेक्षित फायदा झाला नाही. मात्र, विधानसभेत मनसे युतीत नव्हती तेव्हा महायुतीला अधिक जागा मिळाल्या. आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी महायुतीसोबतच राहील, असे ते म्हणाले. राज ठाकरे यांच्या संदर्भात बोलताना आठवले यांनी स्पष्ट केले की, राज ठाकरे आले तरी फारसा फायदा होणार नाही. काँग्रेस त्यांच्यासोबत जाणार नाही, ही त्यांची ठाम भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले.

 ठाकरे- बंधू एकत्र आले तरी परिणाम नाही…

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, नव्या सर्वेनुसार भाजप-शिवसेना (शिंदे गट)-रिपब्लिकन पार्टी महायुतीला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी आमचा फायदाच होईल. महानगरपालिकांवर महायुतीचाच झेंडा फडकणार असल्याचा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला.

नागपुरात ८ मार्चला पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचे नागालॅन्डमध्ये दोन आमदार आहे. तर मनिपूरमध्येही नुकतीच पक्षाला अधिकृत मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्रात येत्या लोकसभा निवडणूकीत आमच्या पक्षाला दोन जागा मिळाल्यास आणि त्या दोन्ही निवडून आल्यास आमच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणे शक्य आहे. देशातील जवळपास सगळ्याच राज्यांत आमचा पक्ष आहे. त्यामुळे देशभरात असलेला रिपब्लिकन गटातील आमचा एकमात्र पक्ष आहे. पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन ८ मार्चला नागपुरातील कस्तूरचंद पार्क मैदानावर घेण्याचे प्रस्तावित असून त्यात देशभरातील पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले.