लोकसत्ता टीम

गडचिरोली: गेल्या आठ महिन्यांपासून गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात उच्छाद मांडल्यानंतर छत्तीसगडमध्ये गेलेल्या रानटी हत्तींनी गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा प्रवेश केला आहे. कुरखेडा वनपरिक्षेत्रातील जामनटोला परिसरात गुरुवारी या हत्तींनी शेतीचे नुकसान केले. यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहे.

मागील वर्षी छत्तीसगडवरून गडचिरोली जिल्ह्यात २३ रानटी हत्तींच्या कळपाने प्रवेश केला होता. तीन ते चार महिने या कळपाने सीमाभागात चांगलाच उच्छाद मांडला होता. धानोरा, कुरखेडा, देसाईगंज तालुक्यातील शेतीला यामुळे मोठा फटका बसला. दरम्यान, शेजारील गोंदिया व भंडारा जिल्ह्यात देखील हत्तीच्या कळपाने शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यांनतर हा कळप छत्तीसगड सीमेत दाखल झाला होता. मात्र, कळपातील ८ ते १० हत्तींनी पुन्हा गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात प्रवेश केला. खोब्रामेंढा परिसरात शेतपिकांसह झोपड्यांची नासधूस केल्यानंतर हे हत्ती कुरखेडा वनपरिक्षेत्रातील जामनटोला जंगल परिसरात दाखल होत उन्हाळी पिकांची नासधूस केली.

आणखी वाचा- नागपूर: चित्त्यांचे ‘बारसे’…. नवीन नावे काय दिलीत माहितीये..? ओबान झाला ‘पवन’, सियाया झाली ‘ज्वाला’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या हा कळप पुराडा, रामगड जंगल परिसरात असून गोंदिया जिल्ह्यात प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे. अशी माहिती वन विभगाच्या सूत्रांनी दिली. मागील वर्षी खरीप हंगामात हत्तींनी केलेल्या नुकसानीची अनेकांना भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे हत्तींनी पुन्हा प्रवेश केल्याने या भागातील शेतकरी चिंतेत आहेत.