राजेश्वर ठाकरे

नागपूर : रेल्वेगाडय़ांमधील शयनयान (स्लीपर क्लास) डबे कमी करून वातानुकूलित डबे वाढवण्याच्या रेल्वेच्या धोरणामुळे सर्वसामान्यांचा प्रवास महागला आहे. बहुतांश रेल्वेगाडय़ांमधील शयनयान डब्यांची संख्या ११ वरून ७ वर आणण्यात आल्याने सामान्य प्रवाशांना दुपटीहून अधिक भाडे मोजून वातानुकूलित डब्यांतून प्रवास करावा लागत आहे.

भारतासारख्या खंडप्राय देशात सामान्य नागरिकांना लांब पल्ल्याचा प्रवासासाठी रेल्वे हे सर्वोत्तम साधन आहे. त्यामुळेच शयनयान आणि सर्वसाधारण (जनरल) श्रेणीतील डब्यांमध्ये सदैव गर्दी असते. परंतु, रेल्वे मंडळाच्या नव्या धोरणामुळे सर्वसामान्यांचा रेल्वे प्रवास महाग झाला आहे. रेल्वेने अधिकाधिक वातानुकूलित रेल्वेगाडय़ा चालण्याचे धोरण अवलंबिले आहे. सध्या बहुतांश रेल्वेगाडय़ा २६ डब्यांच्या आहेत. आधी शयनयान श्रेणीचे ११ डबे होते, तिथे आता सात डबे करण्यात आले आहेत. याउलट वातानुकूलित डबे (थर्ड एसी) वाढवण्यात आले आहेत. मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसचे उदाहरण घेतल्यास शयनयान श्रेणीचे भाडे (नागपूर-मुंबई) प्रति व्यक्ती ४६० रुपये तर वातानुकूलित तृतीय श्रेणीचे भाडे १,२१० रुपये आहे.नागपूर- मुंबई दूरांतो एक्स्प्रेस आणि अमरावती- मुंबई अंबा एक्स्प्रेस या रेल्वेगाडय़ांच्या रचनेत १६ जूनपासून बदल करण्यात आले. त्यानुसार, शयनयान श्रेणीच्या डब्यांची संख्या कमी करताना फक्त दोन डबे ठेवण्यात आले असून, त्याऐवजी वातानुकूलित थ्री टियर श्रेणीचे डबे वाढवण्यात आले आहेत. या बदलामुळे, शयनयान श्रेणीची प्रतीक्षा यादी लांबलचक होत असून, वातानुकूलित श्रेणीतील अनेक जागा (शायिका) रिकाम्या राहात आहेत. परिणामी, उत्पन्न वाढवण्याचा रेल्वेचा हेतूही अपेक्षेइतका साध्य होत नाही.

शयनयान श्रेणीचे डबे कमी करून वातानुकूलित डबे वाढवण्याच्या धोरणानुसार सर्वच रेल्वेगाडय़ांमधील शयनयान डबे टप्प्याटप्याने काढून टाकले जात आहेत. देशात सध्या १३ हजार मेल आणि एक्स्प्रेस धावतात. या सर्व गाडय़ांमध्ये शयनयान डब्यांची संख्या सहा किंवा सातवर आणण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना अनेकदा शयनयान डब्यांऐवजी जादा पैसे मोजून वातानुकूलित डब्यांतून प्रवास करावा लागतो. शिवाय, शयनयान श्रेणीची प्रतीक्षायादी लांबत जाते आणि अनेकदा जादा भाडय़ामुळे वातानुकूलित श्रेणीकडे प्रवासी पाठ फिरवत असल्याचेही चित्र दिसते.

मध्य रेल्वेची सद्य:स्थिती

मध्य रेल्वेवर एकूण ७०० मेल आणि एक्स्प्रेस धावतात.
या मार्गावर १८५० उपनगरीय लोकल गाडय़ा आहेत. मेल आणि एक्स्प्रेससाठी सुमारे अडीच हजार डबे वापरात आहेत. यामध्ये एक हजार वातानुकूलित, ९०० शयनयान आणि ६०० सर्वसाधारण डबे आहेत.

डब्यांची संख्या अशी

’दूरांतो एक्स्प्रेस: एसी थ्री टियर १५, शयनयान श्रेणी २
’अमरावती एक्स्प्रेस : एसी थ्री टियर १०, शयनयान श्रेणी २
’विदर्भ एक्स्प्रेस : एसी थ्री टियर ५, शयनयान श्रेणी ७

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वेने वातानुकूलित डबे वाढवण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. मात्र, सामान्य प्रवाशांची अडचण होत असल्याच्या तक्रारी विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समिती आणि प्रवासी संघटनांना प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींबाबत रेल्वेमंत्रालयाला कळवण्यात आले आहे. –तुषार कांत पांडे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे