नागपूर: दसऱ्याच्या मुहूर्तासाठी महारेराने मंजूर केलेल्या ४०५ नवीन प्रकल्पांना नोंदणीक्रमांक दिले गेले आहे . त्यामुळे घराची स्वप्न बघणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यात विदर्भातील ३१ प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय २०० प्रकल्पांना मुदतवाढ तर २०० प्रकल्पांच्या प्रस्तावातील सुधारणांनाही महारेराने मंजुरी दिली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर नवनवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्याची , घोषित करण्याची स्थावर संपदा क्षेत्रात परंपरा आहे.  हे वर्षही त्याला अपवाद नाही . दसऱ्याच्या मुहूर्तावर नवनवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू करता यावे यासाठी या प्रकल्पांना महारेरा नोंदणीक्रमांक , जुन्या प्रकल्पांबाबत

विकासकांनी प्रस्तावित आराखड्यासह केलेल्या विनंतीनुसार मुदतवाढ आणि काही मंजूर प्रकल्पातील सुधारणांच्या सुमारे ८०९ प्रकल्पांना महारेराने मंजुरी दिली आहे . त्यासाठी संबंधित नोंदणी यंत्रणेचे संपुर्ण मनुष्यबळ अहोरात्र कार्यरत होते . दसऱ्याच्या आदल्या दिवशी तर तब्बल २०० प्रकल्पांना प्रमाणपत्र मंजूर करण्यात आले. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना महारेरा नोंदणीक्रमांक दिले आहे. ८०९ प्रकल्पांत  नवीन नोंदणी क्रमांकाचे ४०५ प्रकल्प आहेत . २०९ प्रकल्पांचे मुदतवाढीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. शिवाय १९५ प्रकल्पांनी काही सुधारणांचे प्रस्ताव सादर केले होते,  ते मंजूर करण्यात आले आहे.

सर्वाधिक प्रकल्प पुण्यातील

महारेरा नोंदणीक्रमांक मिळालेल्या प्रकल्पांत सर्वाधिक १२२ प्रकल्प पुण्याचे आहेत. तर सातारा ६ , कोल्हापूर आणि सांगलीचे प्रत्येकी ४ व सोलापूरच्या ३ प्रकल्पांचा समावेश आहे. मुंबई महाप्रदेशाचे १९७ प्रकल्प आहेत. यात मुंबई शहर आणि उपनगर मिळून ६३, ठाण्याचे ५८, रायगडचे ४१, पालघरचे २२, रत्नागिरीचे ९ आणि सिंधुदुर्गचे ४ प्रकल्प आहेत. विदर्भाच्या ३१ प्रकल्पांत नागपूरच्या २०, अमरावतीच्या ५ , अकोल्याच्या ४ आणि चंद्रपूरच्या २ प्रकल्पांचा समावेश आहे. खानदेशातील २९ प्रकल्पांत नाशिकचे २३, अहिल्यानगरचे ५ आणि धुळ्याचा १ प्रकल्प आहे. मराठवाड्यात ९ प्रकल्प असून संभाजीनगरचे ५, जालन्याचे ३ आणि लातूरच्या एका प्रकल्पाचा यात समावेश आहे.

सहा महिन्यात पाच हजार प्रकल्पाचे प्रस्ताव…

एप्रिल २५ ते सप्टेंबर २५ या ६ महिन्यात ४९४० प्रकल्पांचे प्रस्ताव महारेराने मंजूर केले आहेत. यात २०३९ नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना महारेराने नोंदणीक्रमांक दिले आहेत. विकासकानी प्रकल्प पूर्ततेचा आराखडा देऊन केलेल्या विनंतीनुसार १७४८ जुन्या प्रकल्पांच्या मुदतवाढीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून ११५३ जुन्या प्रकल्पातील सुधारणांचे प्रस्तावही मंजूर करण्यात आले आहेत.