वर्धा: जिल्हा परिषदेच्या ५२ प्रभागाचे आरक्षण सोमवारी सोडत पद्धतीने निश्चित करण्यात आले आहे. दिग्गज म्हटल्या जाणाऱ्या राजकीय कुटुंबास हा सोडतीने धक्का बसला आहे. त्यातच ५० टक्के महिला आरक्षण असल्याने महिलांचा दबदबा राहणार हे निश्चित. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे. म्हणजे याच प्रवर्गातील स्त्री किंवा पुरुष अध्यक्ष होवू शकेल. प्रवर्गाचा सदस्य खुल्या मतदारसंघातून निवडून आला तरी तो अध्यक्षपदाची दावेदारी करू शकतो. यापूर्वी १९९८ मध्ये सिमंतिनी हातेकर या एससी प्रभागातून अध्यक्ष झाल्या होत्या. तब्बल २७ वर्षानंतर आता या प्रवर्गास संधी मिळाली आहे.

या प्रवर्गाचे जिल्ह्यातील प्रभाग असे आहेत. वर्धा तालुक्यातून सिंदी, नालवाडी व सावंगी. आर्वीत वाठोडा. देवळीत गुंजखेडा, गौळ व नाचणगाव. असे ७ प्रभाग एससी प्रवर्गासाठी राखीव आहेत. आर्वी, देवळी व वर्धा याच तीन तालुक्यात एससी प्रवर्ग आरक्षण आले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय विचार केल्यास सर्वाधिक संधी देवळी मतदारसंघास मिळाल्याचे म्हटल्या जावू शकते. तर हिंगणघाट मतदारसंघात एकही एससी प्रवर्ग राखीव नसल्याने अध्यक्षपद अशक्य. तसेच ८ पैकी केवळ तीन तालुक्यातच एससी आरक्षण निघाले असल्याने याच तालुक्यातील एससी सदस्य भावी अध्यक्ष होणार. त्यामुळे उपाध्यक्षपद किंवा सभापतीपदे देण्यासाठी हिंगणघाट किंवा अन्य तालुक्याचा विचार राजकीय तडजोडीत होणार.

इतर ठिकाणी असलेले आरक्षण असे राहील. हिंगणघाट तालुक्यात वाघोली, सावली, शेकापूर, अल्लीपूर व कानगाव असे तब्बल पाच प्रभाग हे सर्वसाधारण महिला प्रवर्गास राखीव झाले आहे. वडनेर व पोहना हे सर्वसाधारण. समुद्रपूर तालुक्यात गिरड व मांडगाव सर्वसाधारण. कांधली ओबीसी व नदोरी ओबीसी महिला. कोरा प्रभाग अनु. जमाती. देवळीत अंदोरी सर्वसाधारण महिला, इंझाला व भिडी ओबीसी महिला.

आर्वीत जळगाव सर्वसाधारण व वाढोणा सर्वसाधारण महिला. मोरांगना व रोहणा अनु. जमाती महिला, विरूळ अनु. जमाती. कारंजा तालुक्यात पार्डी व कन्नमवार ग्राम सर्वसाधारण महिला, ठानेगाव सर्वसाधारण व सिंदीविहिरी अनु. जमाती महिला. आष्टीत साहूर अनु. जमाती महिला, लहान आर्वी सर्वसाधारण तर तळेगाव सर्वसाधारण महिला. सेलूत झडशी अनु. जमाती, केळझर व महाबळा सर्वसाधारण, येळकेळी व हमदापुर ओबीसी, घोराड ओबीसी महिला. वर्ध्यात पिपरी, तरोडा, सालोड व तळेगाव सर्वसाधारण, आंजी, सेवाग्राम, वायफड व वायगाव ओबीसी. पवनार, वरुड,बोरगाव ओबीसी महिला.