लोकसत्ता टीम

यवतमाळ : येथील पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार व त्यांच्या पत्नीविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे.

नांदेड येथील भाग्यनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. या कारवाईने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

लोकसेवक संजय पुजलवार हे यवतमाळ येथून २०२४ मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांनी यवतमाळ, उमरखेड, वणी आदी ठिकाणी पोलीस विभागात सेवा दिली. शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर १ मे १९९८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत संपादित केलेल्या मालमत्तेबाबत तक्रारी प्राप्त झाल्ल्यानंतर परिक्षण करण्यात आले. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई कार्यालयाकडून उघड चौकशी सुरू करण्यात आली.

संजय पुजलवार यांनी संपादित केलेली मालमत्ता कायदेशीर स्त्रोताद्वारे संपादित केली किंवा कसे याबाबत त्यांना वेळोवेळी संधी देवून माहिती घेण्यात आली. परंतु त्यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत ते पुष्टीदायक पुरावे सादर करू शकले नाहीत. त्यांनी लोकसेवक पद धारण केलेल्या कालावधीत त्यांना प्राप्त असलेल्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता स्वतःचे नावे व पत्नी मनीषा संजय पुजलवार यांच्या नावे संपादित केल्याचे उघड चौकशी अंती निष्पन्न झाले आहे. त्यांनी संपादित केलेली २८ लाख ७४ हजार १४६ रूपये किंमतीची मालमत्ता ही त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत १६.६५ टक्के जास्त असल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही विसंगत बेहिशोबी मालमत्ता संपादित करण्यासाठी संजय पुजलवार यांना त्यांची पत्नी मनीषा पुजलवार यांनी मदत करून गुन्ह्यास प्रोत्साहित करत अपप्रेरणा दिल्याचा ठपका चौकशीअंती ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार व मनीषा संजय पुजलवार, दोघेही रा.आमदार नगर, मालेगाव रोड, नांदेड यांच्याविरूद्ध मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर यांच्या तक्रारीवरून नांदेड येथील भाग्यनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम १३(१)(ब), १३(२), १२ नुसार अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक प्रशांत पवार, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक माधुरी यावलीकर आदींनी केली. प्रजासत्ताक दिनी या कारवाईची माहिती यवतमाळ पोलीस विभागात पोहोचताच पुजलवार यांच्या कार्यकाळातील अनेक प्रकरणांची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू झाली.