करोनाचा कहर
नागपूर : करोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांना उपचारासाठी सक्तीने विलगीकरणात ठेवले जात होते. त्यामुळे या रुग्णांच्या संपर्कातील लक्षणे असलेले रुग्णही इतरत्र सक्तीने कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याच्या भीतीने इतरत्र पलायन करत होते. त्यामुळे करोनाचा उद्रेक अधिक वेगाने झाल्याचा इतिहास असतानाच आता पुन्हा तिसऱ्या लाटेच्या भीतीने नागपुरात नवीन आढळलेल्या करोनाग्रस्तांना सक्तीने कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये रोष असून पुन्हा पलायन नाटय़ाने करोनाग्रस्त वाढल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
नागपुरात मार्च २०२० मध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर सुरुवातीला कडक टाळेबंदीमुळे करोना संक्रमणाचा वेग खूपच कमी होता. परंतु कालांतराने हळूहळू टाळेबंदी शिथिल झाल्यावर रुग्ण वाढले. सुरुवातीला करोनाग्रस्तांवर उपचाराचा अनुभव नसल्याने सर्व रुग्ण व संशयितांना सक्तीने विलगीकरण केंद्रात ठेवले जात होते. परंतु हळूहळू अनुभवातून गृह विलगीकरणात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचाराची मुभा मिळाली. त्यामुळे आज मोठय़ा संख्येने रुग्ण घरातच उपचारातून बरे होत आहेत. त्यातच तिसऱ्या लाटेचा धोका बघत जगाच्या अनेक देशात डेल्टा प्लस (बी.१.६१७.२.१) हा करोनाचा नवा विषाणू धूमाकूळ घालत आहे. त्यातच नागपुरातही या विषाणूचे ४ रुग्ण आढळल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
दरम्यान, डेल्टा प्लसचा धोका बघता प्रशासनाकडून आता नागपूर जिल्ह्य़ात नवीन रुग्णाला सक्तीने विलगीकरण केंद्रात ठेवून उपचाराचा निर्णय झाला. आता प्रत्येक नवीन रुग्णाला कोविड केअर सेंटरमध्ये ठेवून उपचार होत आहेत. त्यातच आता नागपुरात आढळलेला करोनाचे नवीन रूप हे एवाय ४ असल्याचे पुढे येत आहे. हे रूप डेल्टा प्लसशी सार्धम्य साधणारे असले तरी मुळात डेल्टा प्लस हा प्रकार नाही.
त्यामुळे डेल्टा प्लसच्या नावाने सक्तीने रुग्ण विलगीकरणात उपचारासाठी ठेवण्याच्या निर्णयावर खुद्द रुग्णच प्रश्न उपस्थित करत आहेत. याप्रकाराने शहरातील लक्षणे असलेले बरेच व्यक्ती चाचणी करत नसून संपर्कातील व्यक्तीही संपर्कात आलो नसल्याचे सांगत चाचणी टाळण्याचा प्रयत्न करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे पुन्हा संपर्कातील व्यक्तींचे पलायन नाटय़ घडून पैकी कुणी करोनाग्रस्त असल्यास हा आजार वाढल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
त्यातच या विषयावर जिल्हा शल्यचिकित्सकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी विषाणू डेल्टा की डेल्टा प्लस हे संबंधित प्रयोगशाळेलाच कळणे शक्य असून त्यांना माहिती नसल्याचा दावा केला. तर महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी नागपुरात आढळलेल्या विषाणूचे रूप हे एवाय ४ असून तो डेल्टा प्लसशी मिळताजुळता असला तरी डेल्टा प्लस नसल्याचे सांगितले.
प्रशासनाच्या निर्णयामुळे रुग्णांमध्ये संताप
रुग्ण वाढत असले तरी प्रत्येकाला सक्तीने विलगीकरणात ठेवले जात असल्याने स्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. येथे चांगल्या प्रतीच्या जेवणाची सोय आहे. सोबत हवे असल्यास त्यांना त्यांच्या घरचेही जेवण येथे घेता येते. विलगीकरणाची पेड सुविधाही काही हॉटेल्समध्ये केली गेली आहे. प्रशासन काळजी घेत असल्याने कुणीही पलायन करण्याची शक्यता वाटत नाही. सात दिवसात रुग्णाची पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत असून नकारात्मक अहवाल आल्यास त्याला परत घरी सोडण्यात येत आहे.
– राम जोशी, अतिरिक्त आयुक्त (शहर), नागपूर महापालिका.