चंद्रपूर : शेतमाल तारण न ठेवता बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल ४६ लाख ५८ हजार ५० रुपये तीन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा खळबळजनक प्रकार वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे उघडकीला आली. याप्रकरणाची चौकशी झाल्यानंतर निलंबित पर्यवेक्षकासह चार जणां विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यासंदर्भात बाजार समितीचे सचिव चंद्रशेन शिंदे यांनी वरोरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गारघाटे यांच्यासह विजय कळसकर, गुरुदत्त कुळसंगे यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता ४०६, ४०९, २४०,४७१,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या बाजार समितीत यापूर्वी कांदा अनुदानाता लाखोंचा घोटाळा झाला होता. याप्रकरणात पर्यवेक्षक कोमल गारघाटे यांना निलंबित केले होते. गारघाटे यांच्याकडे शेतमाल तारण योजनेची जबाबदारी होती. तारण योजनेत शेतमाल ठेवल्यानंतर शेतकऱ्याला मालाच्या एकूण किंमतीच्या ७५ टक्के रक्कम दिली जाते. गार घाटे याने २१ एप्रिल २०२२ ते १२ एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये शेतमाल तारण योजनेत ठेवला नाही.

बनावट कागदपत्र तयार केली. वरोऱ्या येथील अनिल मधुकर तडसे याच्या बँक खात्यावर ३१ लाख ७७ हजार २५८, विजय पुंजाराम कळसकर (रा. परसोडा ) यांच्या बँक खात्यावर १९ लाख 85 हजार ३७२ आणि गुरुदत्त महादेव कुळसंगे याच्या बँक खात्यावर चार लाख ९५ हजार ४२० जमा केले. या तिघांच्या खात्यावर ४६ लाख ५८ हजार ५९ रुपये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बँक खात्यातून वळते करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात तारण योजनेत शेतमाल (सोयाबीन) जमा केले नव्हते. कांदा अनुदान घोटाळ्यात पर्यवेक्षक गारघाटे यांना आधीच निलंबित केले होते.