नागपूर : ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचा_याने पत्नीच्या मदतीने स्वत:च्या घरातच देहव्यवसायाचा अड्डा सुरु केला होता. गरीब कुटुंबातील मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्याची पत्नी काही मुलींना देहव्यवसायाच्या दलदलीत ढकलत होती. गोपनिय माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मानकापूर पोलीस ठाण्यांतर्गत ताजनगर परिसरातील पार्वती सहनिवास येथे त्याच्या घरी धाड टाकली. चार आरोपींना अटक करून दोन पीडितांची सुटका केली. अटकेतील आरोपींमध्ये सचिन दिलीप मेश्राम (३५), सोनाली सचिन मेश्राम (२०) दोन्ही रा. ताजनगर मानकापूर, आकाश अशोक जगनीत (३२) रा. कामठी आणि एका ४८ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन मेश्राम हा नागपूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होता. त्याला एका प्रकरणात सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. दरम्यान ताजनगर परिसरात देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग (एसएसबी)ला मिळाली होती. मुख्य आरोपी हा आंबटशौकीन ग्राहकांना मुली० पुरविण्याचे काम करत असल्याचे समजले. तपासाअंती समोर आले की, सचिन मेश्राम याने १४ फेब्रुवारी रोजी सोनाली मेश्रामसोबत दुसरे लग्न केले होते आणि तेव्हापासून तो या अपार्टमेंटमध्ये राहत होता. आकाश जगनीत हा दलालीचे काम करत होता. त्याने ४८ वर्षीय महिलेच्या मुलीला या ठिकाणी पाठवले होते.

कोलकात्यातील तरुणी देहव्यापारात

सचिनने पोलीस दलात असताना सोनालीशी मैत्री केली होती. त्याने देहव्यापार सुरु करण्यासाठी सोनालीची मदत घेतली. त्यानंतर त्याने 15 दिवसांपूर्वीच सोनालीशी दुसरे लग्न केले. सोनालीकडे सेक्स रॅकेटमध्ये अल्पवयीन मुली, तरुणी आणि मॉडेल तरुणींना आणण्याची जबाबदारी सचिनने दिली होती. सचिनची पत्नी सोनाली हिने कोलकात्याहून एका तरुणीला देहव्यापारासाठी नागपुरात बोलावले होते. तसेच ती अन्य तरुणीच्या संपर्कात राहून ग्राहकानुसार तरुणींना स्वतःच्या घरात बोलावत होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बनावट ग्राहक पाठविल्यामुळे सापडत्या तरुणी

पोलिसांनी पुरावा गोळा करण्यासाठी आपला बनावट ग्राहक म्हणून पाठवला. ग्राहाकाचा इशारा मिळताच पोलिसांनी छापा टाकला आणि चारही आरोपींना रंगेहात अटक केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी ४ मोबाइल फोन आणि ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चारही आरोपींवर पीटा कायद्याच्या विविध कलमांनुसार मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी त्यांना मानकापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.