नागपूर : फेब्रुवारी महिन्यात खुनाची एकही घटना न घडलेल्या उपराजधानीत मार्च महिन्यात तब्बल १२ हत्याकांड घडले. अवघ्या बारा तासांत दोन हत्याकांडांमुळे उपराजधानी पुन्हा एकदा हादरली. अनैतिक संबंध आणि कौटुंबिक वादातून बुधवारी रात्री दोन खुनाच्या घटना घडल्या.

अनैतिक संबध असल्याच्या संशयावरून आशीष जयलाल बिसेन (२६, आंबेडकरनगर, वाडी) या तरुणाचा खून केल्याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी नीलेंद्र कपूरचंद बघेल (२५, खापरी) या आरोपीला अटक केली. आशीष आणि आरोपी नीलेंद्र हे हातमजुरी करायचे. आशीषची नीलेंद्रच्या पत्नीसोबत मैत्री होती. त्यामुळे दोघेही सतत फोनवर बोलत होते. पती घरी नसताना आशीष तिला भेटायला यायचा. त्यामुळे आपल्या पत्नीचे आशीषसोबत अनैतिक संबंध आहेत, असा संशय नीलेंद्रला होता. या संशयातून नीलेंद्रने २६ मार्च रोजी आशीषला खापरी येथे बोलावले.

डोंगरगाव शिवारातील  झुडुपात नेऊन चाकूने भोसकून त्याचा खून केला आणि मृतदेह झुडुपात फेकून दिला. वाडी पोलिसांनी गुरुवारी सकाळी ६ वाजताीनीलेंद्रला ताब्यात घेऊन घटनास्थळी नेले असता त्याने मृतदेह दाखवला. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून नीलेंद्रला अटक केली.

जावयाने केला मेहुण्याचा खून

घर रिकामे करण्यावरून झालेल्या वादात जावयाने महुण्याच्या डोक्यावर फावडय़ाने मारून खून केल्याची घटना हुडकेश्वर हद्दीत सरस्वतीनगर येथे घडली. या घटनेनंतर आरोपी हा स्वत: पोलिसांना शरण आला. जयकिशन शाम जावणकर (२८) असे मृताचे नाव असून नीतेश शंकर सोनावणे (२४) दोन्ही रा. सरस्वतीनगर असे आरोपीचे नाव आहे. सरस्वतीनगरात जयकिशनचे वडिलोपार्जित घर आहे. त्याची बहीण प्रियाने नीतेश सोनवणेसोबत दुसरे लग्न केले असून ती वडिलांच्या घरी पतीसह वरच्या माळय़ावर राहते. प्रियाला संपूर्ण घरावर ताबा हवा होता. जयकिशनने घर सोडून जावे, यासाठी ती तगादा लावायची. यातून त्यांच्यात अनेकदा वाद झाले. २२ फेब्रुवारी रोजी झालेला वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी दोघांवरही प्रतिबंधात्मक कारवाई केली

होती. दरम्यान, घर रिकामे करण्यावरून बुधवारी रात्री  जयकिशन आणि प्रिया यांच्यात वाद झाला. जयकिशनने प्रियाला शिवीगाळ केल्यामुळे नितेश संतापला. त्याने लोखंडी फावडय़ाने जयकिशनच्या डोक्यावर वार करून त्याला जागीच ठार केले. त्यानंतर हुडकेश्वर पोलीस ठाण्यात जाऊन त्याने खुनाची कबुली दिली. हुडकेश्वर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपी नितेशला अटक केली.

वाडी पोलिसांचा हलगर्जीपणा

दोन दिवस झाले तरी आशीष घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. परंतु, तो कुठेही आढळला नाही. २७ मार्च रोजी आशीषच्या कुटुंबीयांनी वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वाडी पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली मात्र त्याचा शोध घेतला नाही, असा आरोप केला जात आहे.

असा झाला खुलासा अनैतिक संबंधातून आशीष आणि नीलेंद्र यांच्यात वाद झाला होता, अशी गुप्त माहिती एका युवकाने पोलिसांना दिली. पोलिसांनी नीलेंद्रच्या मोबाईलचे २६ मार्चपासूनचे लोकेशन काढले. यात तो दोन दिवस डोंगरगाव येथे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संशय बळावल्याने पोलिसांनी बुधवारी नीलेंद्रला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आशीषच्या खुनाची कबुली दिली.