ज्येष्ठ पत्रकार सुरेश धोपटे यांचे आज दुपारी हृदयविकाराने राहत्या घरी निधन झाले. ते ७७ वर्षाचे होते. त्यांच्यावर उद्या गुरुवारी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. धोपटे यांनी आचार्य प्र. के.अत्रे तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत पत्रकारिता केली आहे.

आचार्य अत्रेंसोबत पत्रकारीता

विद्यार्थी दशेपासून लिखाणाची आवड असलेल्या धोपटे यांचा मुंबईतील मराठा दैनिकाशी पत्रव्यवहार होत होता. त्यातील चुणूक पाहून आचार्य अत्रे यांनी त्यांना मुंबईत बोलावून घेतले होते. मराठा वृत्तपत्रात त्यांनी काही काळ काम केले. त्यानंतर ते फ्री प्रेस जर्नल या वृत्तपत्रात रुजू झाले. येथे व्यंगचित्रकार म्हणून कार्यरत बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांच्याशी चांगला स्नेह राहिला.

राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त

पुढे ते चंद्रपुरात स्थायिक झाले. विख्यात आनंद बझार समूह साठी त्यांनी केलेले वार्तांकन चांगलेच गाजले होते. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी समाचार भारती, वृत्तसंस्था,ब्लिट्झ, करंट तसेच नवशक्ती, नाग टाइम्स, सामना, जनवाद या वृत्तपत्रांसाठी काम केले होते. जवळपास पाच दशके चंद्रपुरात काम केल्यानंतर ते वर्धेत मुक्कामास आले होते. त्यांच्यामागे एक मुलगा पत्रकार प्रवीण, मेघा व निशा या दोन मुली, जावई व मोठा आप्तपरिवर आहे. त्यांच्या निधनानंतर ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार व अन्य मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.