नागपूरः मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री गुरुवारी मेडिकल रुग्णालयात बघायला गेलेल्या रुग्णाचाही (मुलाचा) दुपारी मृत्यू झाला. त्यामुळे मध्य प्रदेशातील कफ सिरप प्राशन करून नागपुरातील विविध रुग्णालयात दगवलेल्या मुलांची संख्या १७ वर पोहचली आहे.

नागपुरातील रुग्णालयात गुरुवारी दुपारी दगावलेला रुग्ण एक वर्षाचा आहे. खोकला झाल्यावर बरे होण्यासाठी घेतलेले औषध त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहे. या मुलाला गुरुवारी काही तासंपूर्वीच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बघायला आले होते. तर त्यापूर्वी बुधवारी मध्यरात्री मेडिकलमध्ये मयांक सूर्यवंशी (३) या मुलाचा मृत्यू झाला होता. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) आणि इतर खासगी रुग्णालयांत आजपर्यंत छिंदवाडा परिसरातील कफ सिरप प्राशन केलेले एकूण ३६ रुग्ण दाखल झाले.

त्यापैकी नवीन मृत्यू पकडून आजपर्यंत १७ रुग्णांचा मृत्यू झाला. सर्व रुग्ण दोन ते ८ वर्षे वयोगटातील आहेत. नागपुरातील विविध रुग्णालयांत दगावलेल्यांपैकी १५ रुग्ण छिंदवाडा परिसरातील तर एक रुग्ण शिवनी तर एक रुग्ण पांढुर्णा परिसरातील आहे. कफ सिरपशी संबंधित रुग्णांच्या स्वतंत्र नोंदी ठेवण्याची तरतूद नसल्याने अचूक आकडेवारी पुढे येत नव्हती. परंतु, नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेत शहरातील विविध रुग्णालयांशी समन्वय साधून आकडेवारी गोळा केली. तूर्तास शहरात ३ रुग्ण दाखल असून त्यापैकी एक रुग्ण जीवनरक्षण प्रणालीवर आहेत.

‘सिरप’वर बंदीनंतर रुग्णसंख्या घटली

मध्य प्रदेश सरकारने ‘कोल्ड्रिफ’ या कफ सिरपवर बंदी घातली आहे. या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल (डीईजी)चे प्रमाण ४६ टक्के आढळले होते. रुग्णांना सिरप देणे बंद झाल्याने रुग्णांची संख्या कमी झाली, असे निरीक्षण नागपुरातील वैद्यकीय क्षेत्राकडून नोंदवण्यात आले.

नागपूर महापालिकेचे म्हणणे काय ?

नागपुरातील विविध रुग्णालयांत मध्य प्रदेशातून एकूण ३६ रुग्ण आले. त्यापैकी १७ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू अंकेक्षणात मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. सध्या ३ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत, अशी माहिती नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आज नागपुरात ?

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव गुरुवारी नागपुरात आले. त्यांनी कफ सिरफ प्रकरणातील नागपुरातील विविध रुग्णालयात दाखल रुग्णांच्या प्रकृतीचा आढावा घेतला. ते एम्स, खासगी रुग्णालय आणि मेडिकलला जाऊन रुग्णांना भेटले.