नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष व खासदार शरद पवार शुक्रवारी (८ ऑगस्ट) दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी (९ ऑगस्ट) मंडल यात्रा काढण्यात येणार असून तिचा शुभारंभ त्यांच्या पवार यांच्या हस्ते व्हेरायटी चौक, आशीर्वाद लॉन येथून होणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच पवार यांचा हा नागपूर दौरा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्व आहे. शुक्रवारी सांयकाळी पवार यांचे दिल्लीहून नागपुरात आगमन होईल. त्यांचा मुक्का एका खासगी हॉटेलमध्ये आहे. ते स्नेहभोजनासाठी पक्षाचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांचे निवासस्थानी जाणार आहे. त्यानंतर ९ ऑगस्टला सकाळी ९ वाजता मंडल यात्रेला हिरवी झेंडी दाखवतील, असे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. विविध विकास कामे पूर्ण करून वर्ष दीड वर्ष झाले आहे. परंतु, अद्यापही कामचे देयक न मिळाल्याने राज्यातील कंत्राटदाराचे सुमारे ९० हजार कोटी रुपये देणे बाकी आहे. अनेक कंत्राटदार हे कर्जबाजी झाले आहे, असा दावा देशमुख यांनी केला.
शेतकरी कर्जमाफीचा विसर
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्ता येताच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार, असे आश्वासन दिले होते. त्याचा विसर त्यांना पडला आहे. पूर्व विदर्भात धान खरेदी संदर्भात सरकार उदासिन आहे. धानाचा बोनस देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. विदर्भात कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहे. विधानसभा निवडणूक प्रचारात सत्ता आल्यास लाडकी बहिण योजनेचे मानधन १५०० वरून २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. तेही पाळण्यात आले नाही. याकडेही देशमुख यांनी लक्ष वेधले.
धान खरेदी आणि बोनस
नुकताच मी आणी माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी पुर्व विदर्भातील चंद्रपुर, गडचिरोली, गोदिंया व भंडारा जिल्हाचा दौरा केला. हे चारही जिल्हात धानाचे मोठया प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. धान खरेदीच्या संदर्भात सुध्दा राज्य सरकार उदासिन आहे. पुर्वी एक तारीख निश्चित करुन त्या तारखेपर्यंत संपुर्ण धान खरेदी करण्यात येत होती. परंतु सध्या परीस्थीतीमध्ये एक कोटा ठरवुन दिला जातो तेवढीच खरेदी करण्यात येते. यामुळे शेतकऱ्याकडील संपुर्ण धान खरेदी होत नाही. शासनाची खरेदी होत नसल्याने नाईलाजाने शेतकऱ्यांना कमी दरात व्यापाऱ्याकडे धान विकावा लागतो. राज्य कृषी मुल्य आयोगाने धानाचा हमीभाव ४५०० रुपये द्यावा अशी मागणी केंद्रीय कृषी मुल्य आयोगाकडे केली होती, असेही देशमुख म्हणाले.