नागपूर: बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे वादग्रस्त विधाने करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते साधे बोलतच नाही, वादग्रस्तच बोलतात, त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तंबी दिली, पण ते सुधरायला तयार नाही, आता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणाऱ्या खर्चासंबंधी वादग्रस्त विधान केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता सहज आणि सोप्या राहिल्या नाही, काही ठिकाणी तर एक-दोन- तीन कोटी रुपये खर्च करावा लागतो, ऐव्हडेच नव्हे तर काही ठिकाणी १०० बोकड द्यावे लागतात. एवढ्या खर्चिक निवडणुकीत कार्यकर्ते उदद्धवस्त होतात, असे बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले. ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात बोलत होते.

गायकवाड म्हणाले, आम्ही भाजप-शिवसेना (शिंदे) युतीला प्राधान्य देतो, आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुकीत युती करतो, पण जेंव्हा कार्यकर्त्यांची निवडणूक असते (स्थानिक स्वराज्य संस्था) तेव्हा आपण त्यांना वाऱ्यावर सोडतो. आता निवडणुका पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत, काही ठिकाणी एक-दोन तर काही ठिकाणी तीन कोटी रुपये खर्च करावा लागतो, १०० बोकड द्यावे लागते. त्यांना खर्च झेपत नाही, त्यांनी मग काय मातीत जावे का ?

शिवसेना -भाजप युती झाली पाहिजे. चिखली, मलकापूर येथे जे धोरण ठरले असेल तेच धोरण बुलढाण्यात ठरले तर आपण युतीस तयार आहोत. कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे ,असे संजय गायकवाड म्हणाले.