लोकसत्‍ता टीम

अमरावती : नाट्यमय घडामोडीत महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने दर्यापूर मतदारसंघातून गजानन लवटे यांना उमेदवारी जाहीर केल्‍याने काँग्रेसमधील इच्‍छुकांना धक्‍का बसला आहे. काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी शनिवारी जाहीर केली. त्‍यात दर्यापूर मतदारसंघाचे नाव नव्‍हते, त्‍यामुळे काँग्रेसमधील इच्‍छुक उमेदवारांची घालमेल वाढली होती. त्‍यातच सायंकाळी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने गजानन लवटे यांच्‍या उमेदवारीची घोषणा केली.

गजानन लवटे हे दर्यापूर खरेदी विक्री सोसायटीचे संचालक असून गेल्‍या निवडणुकीच्‍या वेळीही उमेदवारीसाठी स्‍पर्धेत होते. पण, युतीत ही जागा भाजपच्‍या वाट्याला आली होती.

आणखी वाचा-स्वत: खासदार झाले, आता आमदारकीसाठी पत्नीला तिकीट… काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी फेरून…

गेल्‍या निवडणुकीत रिपाइं गवई गट सोडून काँग्रेसचे उमेदवार म्‍हणून निवडणूक लढवणारे बळवंत वानखडे यांनी भाजपचे रमेश बुंदिले यांचा पराभव केला होता. नुकत्‍याच झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत बळवंत वानखडे यांनी भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांना पराभूत करून दिल्‍ली गाठल्‍याने बळवंत वानखडे यांच्‍या जागी उमेदवार कोण, याची उत्‍सुकता ताणली गेली होती. दर्यापूरची जागा काँग्रेसलाच मिळेल, असा दावा काँग्रेसचे नेते करीत होते, पण शिवसेनेने (उद्धव ठाकरे) देखील या जागेवर दावा केला होता. त्‍यामुळे महाविकास आघाडीच्‍या उमेदवाराची घोषणा लांबली होती.

दर्यापूरमधून महायुतीतर्फे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षातर्फे माजी आमदार अभिजीत अडसूळ यांना याआधीच उमेदवारी जाहीर झाली आहे. त्‍यांच्‍या विरोधात महायुतीतील घटक पक्ष असलेल्‍या आमदार रवी राणा यांच्‍या युवा स्‍वाभिमान पक्षाने भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीत रवी राणा यांनी बंड घडवून आणले असताना अडसूळ यांच्‍या अडचणी वाढल्‍या आहेत. आता काँग्रेस ऐवजी शिवसेनेकडे (उद्धव ठाकरे) मतदारसंघ गेल्‍याने काँग्रेसच्‍या इच्‍छुक उमेदवारांना चांगलाच धक्‍का बसला आहे.

आणखी वाचा-काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षाला मतदारसंघ मिळेना… पक्षाने मुलालाही वाऱ्यावर सोडल्याने…

काँग्रेसच्‍या उमेदवारीसाठी रिपाइं सोडून काँग्रेसमध्‍ये आलेले रामेश्‍वर अभ्‍यंकर, तसेच नागपूर येथील उद्योजक गुणवंत देवपारे हे प्रबळ दावेदार मानले जात होते. सामाजिक कार्यकर्ते विजय विल्‍हेकर यांच्‍या नावाचीही चर्चा होती, पण शिवसेनेने उमेदवार जाहीर केल्‍याने आता काँग्रेसमधील इच्‍छुक उमेदवार कोणती भूमिका घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दर्यापूर हा शिवसेनेचा गड मानला जात होता. १९९० मध्‍ये प्रकाश भारसाकळे हे शिवसेनेचे आमदार म्‍हणून निवडून आले होते. २००५ पर्यंत त्‍यांनी दर्यापूरचे प्रतिनिधित्व केले. होते. २००९ मध्‍ये हा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्‍यानंतर दर्यापूरमधून अभिजीत अडसूळ हे शिवसेनेच्‍या उमेदवारीवर निवडून आले होते.