नागपूर : पारंपरिक इंधनस्रोत कमी होत चालले आहेत. अपारंपरिक ऊर्जेची गरज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे घरगुती व औद्योगिक पातळीवर सौर ऊर्जा वापरण्याकडे कल दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जा क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या वापराचा प्रत्यक्ष अनुभव देणारे अपारंपरिक ऊर्जा अनुभव केंद्र नागपुरात उभारण्यात आले आहे. अशाप्रकारचे हे मध्य भारतातील पहिले केंद्र असल्याचे ग्रीन लाईफ सोल्युशनच्या संचालक नेहा देवतळे यांनी सांगितले.
बाजारात आता सौर ऊर्जेवर चालणारी अनेक उपकरणे उपलब्ध झाली आहेत. यामध्ये सोलर कुलर, सोलर गिझर, सोलर पंखे आणि कृषी पंपांचा समावेश आहे. विशेषतः ग्रामीण भागात, जिथे नियमित वीजपुरवठा अडचणीचा आहे, तेथे सौरऊर्जेवर चालणाऱ्या
कृषी पंपांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सरकारदेखील सौरऊर्जेचा प्रचार करत असून अनुदान आणि योजनांद्वारे नागरिकांना सौर उपकरणे बसवण्यास प्रोत्साहन देत आहे. दीर्घकालीनदृष्ट्या ही गुंतवणूक फायदेशीर ठरत असून पर्यावरणपूरकही आहे. सौरऊर्जेचा वापर वाढल्याने वीजबिलात बचत, स्वयंपूर्णता आणि हरित ऊर्जा वापराचे ध्येय साध्य होत आहे. भविष्यात सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पण, या क्षेत्रात होणारे संशोधन, नवीन उपकरणे यांचा वापर हा कुतूहलाचा विषय असतो. ही बाब लक्षात घेऊन ग्रीन लाईफ सोल्युशन्स प्रा. लि. ने विविध अक्षय ऊर्जा उत्पादन अनुभव केंद्र सुरू केले आहेत. या केंद्राचा उद्देश लोकांना अक्षय ऊर्जेच्या विविध स्रोतांची आणि तंत्रज्ञानाची माहिती देणे आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे.
हे केंद्र लोकांना सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बायोमास, हायड्रोजन आणि ई-वाहन या अक्षय ऊर्जा स्रोतांबद्दल माहिती तसेच उपकरणाची ओळख करून देईल. अभ्यागतांना सौर पॅनेल, पवनचक्की आणि इतर आधुनिक उपकरणांची प्रत्यक्ष ओळख मिळेल. हे केंद्र भविष्यात अक्षय ऊर्जा क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी एक प्रशिक्षण केंद्र म्हणूनही काम करेल.
‘सोलर देश यात्रा ट्रक रोड शो’ सुरू
या अनुभव केंद्राच्या माध्यमातून आम्ही लोकांना अक्षय ऊर्जेचे फायदे समजावून देऊ आणि त्यांना या क्षेत्रात सक्रिय होण्यासाठी प्रोत्साहित करू. त्याचाच एक भाग म्हणूल होयमाइल्सचा ‘सोलर देश यात्रा ट्रक रोडशो’ नागपूर (एमआयडीसी हिंगणा) येथून मंगळवारी सुरू झाला. या ‘रोड शो’चे उद्दिष्ट देशभर सौर ऊर्जेचे महत्त्व अधोरेखित करणे व ‘होयमाइल्स’ची अत्याधुनिक उत्पादने सर्वसामान्यांपर्यंत तसेच उद्योग-व्यवसायांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
होयमाइल्स’ हा जगातील दुसरा सर्वात मोठा ‘मायक्रोइन्व्हर्टर’ पुरवठादार आहे. कंपनीकडे ३०६ पेक्षा जास्त जागतिक पेटंट्स आहेत, अशी माहिती नेहा देवतळे यांनी दिली.