नागपूर : वायुसेनेत सेवारत एका जवानाने कर्तव्यावर हजर असताना स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. ही थरारक घटना बुधवारी पहाटे दोन वाजता उघडकीस आली. जवीर सिंग असे आत्महत्या करणाऱ्या वायुसेनेच्या जवानाचे नाव आहे.गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत वायुसेनेचे कार्यालय आहे. तेथे जवीर सिंग हे सेवारत होते. मंगळवारी जवीर सिंह हे अल्फा-८ गार्ड ड्युटी करीत असताना पहाटे दोन वाजताच्या सुमारास त्यांनी अचानक शासकीय बंदुकीतून स्वत:च्या डोक्यात गोळी घातली.

गोळी डोक्यात शिरल्यानंतर काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. गोळीचा आवाज ऐकताच मेंटेनन्स कमांड सेंटरमध्ये कार्यरत जवानांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्या ठिकाणी जवीर सिंग हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी लगेच वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. काही वेळातच घटनेची माहिती सर्व जवानांना मिळाली. त्यांनीही तेथे धाव घेतली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी गिट्टीखदान पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश देशमाने यांचे पथक वायुसेना परिसरात दाखल झाले. त्यांनी तेथून मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. या प्रकरणी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद गिट्टीखदान पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा…चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

जवीर सिंह हे वायुसेनेत सार्जेंट पदावर कार्यरत होते. त्यांची ड्युटी अल्फा -८ परिसरात होती. गेल्या दोन दिवसांपासून ते तणावात दिसत होते, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यांनी तणावातून डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, जवीर सिंह यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

हेही वाचा…धानाचे कोठार, पण शेतकऱ्यांचा कल मका, हरभऱ्याकडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्षभरात ७३० जवानांनी केली आत्‍महत्‍या

गेल्या वर्षभरात ७३० जवानांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय मंत्री नित्यानंद रॉय यांनी राज्यसभेत दिली. लष्करी सेवेतील ५५ हजार जवानांनी राजीनामा आणि स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जवानांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद, वैवाहिक कलह किंवा घटस्फोट, आर्थिक अडचणी आणि मुलांसाठी अपुरी शैक्षणिक संधी, या आणि इतर विविध कारणांचा समावेश असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच या अहवालात लष्कराच्या अनेक जवानांनी वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या केल्‍याचे निदर्शास आल्याचेही नमूद करण्यात आहे. यामुळे जवानांच्या आत्महत्या सुरक्षा दल आणि पोलीस विभागासाठी चिंतेचा विषय ठरल्या आहेत.