चंद्रपूर : कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासोबतच त्यांच्यात स्वाभिमान व आत्मबल जागृत करण्यासाठी बाबा आमटे व साधना आमटे यांनी आनंदवनाची निर्मिती केली. आनंदवनाला आज चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. देशात विविध सामाजिक संस्थांची संस्थानिके झाली असताना आनंदवनात मात्र सेवाभाव अजूनही कायम आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.

महारोगी सेवा समिती आनंदवनच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त आनंदवनातील मुख्यमंत्री सभागृहात आयोजित मित्रमेळाव्याचे उदघाटन न्यायमूर्ती गवई यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मंचावर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, महारोगी सेवा समितीचे सहाय्यक सचिव डॉ. प्रकाश आमटे उपस्थित होते.

यावेळी न्यायमूर्ती गवई म्हणाले, देशात मागील मागील काळात प्रचंड मेहनत घेऊन सेवाभावी संस्था उभ्या राहिल्या. मात्र, आता या संस्थानांचे व्यावसायिकरण झाले आहे. अनेक जुन्या सेवाभावी संस्थांमध्ये भांडणे बघावयास मिळत आहेत. मात्र, बाबा आमटे व साधनाताईंनी १४ रुपयांत सुरू केलेले आनंदवन आजही समाजसेवेचा वसा घेऊन काम करीत आहे. हा वारसा आता दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीकडे आला आहे. ही तिसरी पिढीही अत्यंत सेवाभावाने कार्य करीत आहे. या तिसऱ्या पिढीचे कार्य हेमलकसा येथे जाऊन बघितले तेव्हा मनस्वी आनंद झाला. गेली कित्येक वर्ष आनंदवनात येण्याचा योग येत नव्हता. अखेर तो आला. यानंतर मी अनेकदा आनंदवनात येणार आहे. आनंदवनाचे कार्य अशाच पद्धतीने पुढे न्या, त्याला माझा व समाजातील प्रत्येक व्यक्तीचा पाठिंबा मिळत राहील, असा विश्वासही न्यायमूर्ती गवई यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, त्यांच्या पत्नी, तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मातोश्री कमल गवई, डॉ. चंद्रशेखर मेश्राम उपस्थित होते. प्रास्ताविक कौस्तुभ आमटे यांनी केले. संचालन प्रा. राधासवाने व प्रा. मोक्षदा मनोहर यांनी केले.

आईचा आदेश राष्ट्रपतींच्या आदेशापेक्षा महत्त्वाचा

डॉ. विकास आमटे यांनी आनंदवन येथे येण्याचे निमंत्रण अनेकदा दिले. मात्र, आई कमल गवई यांनी दोन महिन्यांपूर्वीच आनंदवन येथे यावेच लागेल, असा आदेश दिला. माझ्यासाठी आईचा आदेश हा राष्ट्रपतींच्या आदेशापेक्षा महत्त्वाचा आहे, याकडेही न्यायमूर्ती गवई यांनी लक्ष वेधले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकरंग पुरवणीतील लेखाचा उल्लेख

या कार्यक्रमात न्यायमूर्ती गवई यांनी ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांच्या रविवारच्या लोकरंग पुरवणीत प्रकाशित ‘संस्थांची संस्थाने होताना’ या लेखाचा उल्लेख करीत देशातील अनेक संस्थांची अवस्था अतिशय वाईट असल्याचे सांगितले. देशातील आदरणीय लोकांनी स्थापन केलेल्या अनेक संस्थांचे व्यावसायिकरण झाले आहे. एवढेच नव्हे तर या संस्थांमध्ये भांडणे, मारामारी होत आहेत. मात्र, बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन याला अपवाद ठरले, असे ते म्हणाले.