वर्धा : शालेय मुलांचे शैक्षणिक मूल्यमापन नियमित प्रक्रिया आहे. शिकवले त्याचे आकलन कितपत झाले, याची तपासणी म्हणून ठराविक अंतराने विविध स्वरूपात चाचणी परीक्षा घेतल्या जात असतात. मात्र या चाचण्या विद्यार्थ्यांना तापदायक ठरत असल्याच्या तक्रारी पण होतात. पालक वर्गच नव्हे तर शिक्षकसुद्धा खाजगीत नाराजी नोंदवितात.

आता समग्र शिक्षण प्रकल्पातर्गत चालू शैक्षणिक सत्रात संकलित मूल्यमापन चाचणी घेण्याचे नियोजित आहे. वर्ग दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन चाचणी भाग एक व दोन अशा तीन चाचण्या १० ते १३ ऑक्टोबर दरम्यान होणार.

सदर चाचणीत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा ( इंग्रजी ) या विषयाच्या चाचण्या राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांसाठी होत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक केली आहे अथवा नाही हे तपासल्या जाणार. या चाचण्या दहावी व बारावीच्या मंडळ परीक्षेप्रमाणे नाहीत. म्हणून विद्यार्थ्यांना त्याचा अतिरिक्त ताण देवू नये. चाचण्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती तपासण्याची आहे. त्यानुसार शिक्षकांना सुधारणा करायची आहे. या चाचणीचे उपयोग व फायदे काय, हे पण शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

अध्ययनाचे मूल्यमापन ते अध्ययनसाठी मूल्यमापन साध्य करणे, विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती तपासून त्यात वाढ करणे, अध्ययन व अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणातील संपादणूक वाढविण्यास मदत, यात राज्याची स्थिती समजून घेणे असे व अन्य उद्देश आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद या चाचण्या पद्धत पुरविणार. या चाचणी पत्रिका सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे. पाण्याने भिजणार नाही याची काळजी अपेक्षित. गटशिक्षणाधिकारी हे या पत्रिका पुरवठा सुरळीत करण्यास जबाबदार राहतील. या पत्रिकाचा मोबाईल फोटो काढणे व त्या समाज माध्यमातून इतरांना पाठविणे, असे गैरप्रकार होवू नये. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य चाचणी आयोजनास सर्वस्वी जबाबदार असतील. चाचणी काळात विद्यार्थी हजर राहण्याची काळजी घेणे अपेक्षित. एखादा विद्यार्थी गैरहजर राहल्यास तो ज्या दिवशी शाळेत हजर होईल त्यादिवशी त्याची चाचणी घेण्याची सूचना आहे. शिक्षक सूचना व उत्तरसूची फक्त शिक्षक वर्गासाठीच आहे. ती विद्यार्थ्यांच्या हाती जावू नये.

संकलित चाचणीच्या गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थिनिहाय कृती कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना आहे. चाचणी कालावधित राज्यातील १०० टक्के शाळा भेटी होतील, असा दंडक आहे. प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, पर्यवेक्षकीय यंत्रणा तसेच डायट यांच्यावर ही जबाबदारी आहे.