scorecardresearch

जागतिक स्तरावर पक्ष्यांच्या संख्येत सातत्याने घट; अधिवासाचे नुकसान, जमिनीचा अतिवापर कारणीभूत

पक्ष्यांच्या अधिवासाचे नुकसान आणि ऱ्हास, जमिनीच्या वापरात होणारे बदल, जमिनीचा अतिवापर आणि हवामान बदल यांमुळे गेल्या तीन दशकांमध्ये जागतिक स्तरावर पक्ष्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे.

नागपूर : पक्ष्यांच्या अधिवासाचे नुकसान आणि ऱ्हास, जमिनीच्या वापरात होणारे बदल, जमिनीचा अतिवापर आणि हवामान बदल यांमुळे गेल्या तीन दशकांमध्ये जागतिक स्तरावर पक्ष्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. पक्ष्यांच्या जैवविविधतेसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे पाच मे रोजी प्रकाशित पर्यावरण आणि संसाधनांच्या वार्षिक पुनरावलोकनाच्या अभ्यासात म्हटले आहे.

मँचेस्टर मेट्रोपॉलिटिन विद्यापीठाच्या नेतृत्वात झालेल्या ‘स्टेट्स ऑफ द वल्र्ड बर्डस’ या अभ्यासातील नोंदीनुसार, जगभरात अस्तित्वात असलेल्या पक्ष्यांच्या प्रजातींपैकी सुमारे ४८ टक्के प्रजातींची संख्या कमी होत आहेत. केवळ सहा टक्के प्रजाती वाढत्या लोकसंख्येचा कल दाखवतात तर सात टक्के प्रजातीबाबत काहीही माहिती नाही. मँचेस्टर मेट्रोपॉलिटीन, कार्नेल विद्यापीठ, बर्डलाईफ इंटरनॅशनल, जोहान्सबर्ग विद्यापीठ, पॉन्टिफिकल झेव्हियरियन विद्यापीठ आणि नेचर कन्झर्वेशन फाऊंडेशन तसेच भारतातील शास्त्रज्ञांचा सहभागाने झालेल्या या अभ्यासात निसर्ग संवर्धनसाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या (आययूसीएन) लाल यादीतील माहितीचा वापर करून पक्ष्यांच्या जैवविविधतेतील बदलांचा आढावा घेण्यात आला. त्यासाठी जगातील ११ हजार पक्ष्यांच्या प्रजातीत होणारे बदल देखील अभ्यासण्यात आले. दहा सरकारी आणि गैरसरकारी संस्थांच्या भागीदारीतून फेब्रुवारी २०२० मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘स्टेट्स ऑफ इंडियाज बर्डस’ अहवालाचे परिणाम थेट या जागतिक मूल्यांकनात समाविष्ट करण्यात आले. उष्णकटिबंधीय जंगलांबरोबरच, नैसर्गिक गवताळ प्रदेश विशेषत: धोक्यात असलेला अधिवास म्हणून समोर आला आहे. उत्तर अमेरिका, युरोप आणि भारतामध्ये गवताळ प्रदेशातील पक्ष्यांमध्ये मोठी घट झाली आहे.

  • जागतिक स्तरावर ४८ टक्के पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या कमी झाली आहे.
  • भारतातील ८० टक्के पक्षी प्रजाती नाहीशा होत आहे, तर ५० टक्के प्रजाती वेगाने कमी होत आहेत.
  • भारतात पाणस्थळावरील ४७ टक्के, गवताळ प्रदेशातील ५९ टक्के तर जंगलातील ६२ टक्के पक्षी प्रजाती नाहीशा होत आहेत.

गवताळ प्रदेशासारख्या अद्वितीय परिसंस्थांमधील वैविध्यपूर्ण पक्षीजीवन टिकवून ठेवायचे असेल तर सरकार आणि संशोधकांनी अशा परिसंस्था आणि तेथील रहिवाशांना प्राधान्य दिले पाहिजे. 

– डॉ. अश्विन विश्वनाथन, नेचर कन्झर्वेशन फाऊंडेशन इंडिया.

उष्ण कटिबंधात पक्ष्यांची विविधता  शिखरावर आहे आणि त्याच ठिकाणी धोक्यात असलेल्या प्रजातींची सर्वाधिक समृद्धता देखील आढळते. उष्णकटिबंधीय पक्ष्यांच्या प्रजातींच्या भविष्याबद्दल आपल्याला  समशीतोष्ण पक्ष्यांपेक्षा खूप कमी माहिती आहे. मात्र, आम्ही आता खंडवितरित पक्ष्यांच्या प्रजातींच्या नामशेष होण्याच्या नवीन लाटेची पहिली चिन्हे पाहात आहोत, ज्यामुळे ‘डोडो’ सारख्या बेटांवरील प्रजातींचे ऐतिहासिक नुकसान झाले आहे.

– डॉ. अलेक्झांडर लीस, मँचेस्टर मेट्रोपॉलिटिन विद्यापीठातील व्याख्याते व अभ्यासाचे प्रमुख लेखक.

एकटय़ा उत्तर अमेरिकेत सुमारे तीन अब्ज पक्ष्यांच्या नुकसानीची अभ्यासपूर्ण माहिती गोळा केल्यानंतर जागतिक स्तरावर पक्ष्यांची संख्या घटण्याचे आणि नामशेष होण्याचे नमुने पाहणे निराशाजनक होते. पक्षी हे पर्यावरणीय आरोग्याचे संवेदनशील सूचक असल्यामुळे त्यांचे नुकसान म्हणजेच जैवविविधतेचे नुकसान आणि मानवी आरोग्य व कल्याणासाठी धोक्याचे संकेत आहेत.  – डॉ. केन रोसेनबर्ग, जीवशास्त्रज्ञ, कॉर्नेल विद्यापीठ.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Steady decline in bird numbers globally damage to habitat overuse land ysh