नागपूर : अनोळखी व्यक्तींशी संवाद साधू नये, त्याला आपल्या जीवनाबाबत माहिती देऊ नये, असे म्हटले जायचे, मात्र झेन-झी जनरेशनच्या काळात काही नवे होणार नाही तरच नवल. असाच एक नवा ट्रेंड शहरात लोकप्रिय होत आहे. बदलत्या जीवनशैलीत मानसिक तणाव हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. या तणावातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि नवीन ओळखी निर्माण करण्यासाठी नागपूर शहरात ‘स्ट्रेंजर मिट’चा ट्रेंड शहरात गाजत आहे. अनोळखी व्यक्ती एकत्र येऊन आपली सुख-दु:ख, अनुभव आणि भावना व्यक्त करतात.

काय आहे ‘स्ट्रेंजर मिट’

नागपूरमधील अनेक सामाजिक गट, स्वयंसेवी संस्था आणि तरुणांनी पुढाकार घेऊन अशा मिट्सचे आयोजन केले आहे. विशेषतः वीकेंडला शहरातील कॅफे, उद्याने, आणि सभागृहांमध्ये असे कार्यक्रम आयोजित होतात. यात सहभागी होणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारच्या पूर्व ओळखीची गरज नसते. प्रत्येकजण मोकळ्या मनाने येऊन आपल्या भावना शेअर करतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण एकटेपण आणि तणावाला सामोरे जातात.

स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे खऱ्या अर्थाने संवाद कमी होत आहे. अशा परिस्थितीत ‘स्ट्रेंजर मिट्स’ लोकांना एकमेकांशी जोडण्याचे काम करतात. ‘एखाद्या अनोळखी व्यक्तीसमोर आपले मन मोकळे करणे खूपच हलके वाटते. यात कोणत्याही निर्णयाची आणि समोरच्या व्यक्तिच भीती नसते. प्रत्येक मिटला नवीन चेहरे येतात आणि प्रत्येकाची कथा वेगळी असते,’ असे या भेटींच्या एका आयोजकाने सांगितले. स्ट्रेंजर मिट्समुळे लोकांमध्ये आपुलकी, सहानुभूती आणि एकमेकांबद्दलचा विश्वास वाढतो आहे. विशेषतः तरुणांना या भेटींमुळे नवीन मित्र मिळतात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो, असा मानस आहे.

ट्रेंड वाढण्याचे कारण काय?

उपराजधानी नागपूर हे शिक्षण आणि नोकरीच्या संधींसाठी विदर्भातील प्रसिद्ध शहर आहे. येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नोकरदार तरुण राहतात. अनेकजण आपल्या गावापासून दूर असल्याने एकटेपणा जाणवतो. अशा वेळी ‘स्ट्रेंजर मिट्स’ त्यांच्यासाठी एक सामाजिक व्यासपीठ ठरत आहे. शहरातील अनेक कॅफे आणि सामुदायिक जागांनीही या उपक्रमांना प्रोत्साहन दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही ठिकाणी या मिट्ससाठी विशेष जागा आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याशिवाय, सोशल मीडियावरही या मिट्सची माहिती पसरवली जाते. इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि फेसबूक ग्रुप्सच्या माध्यमातून आयोजक लोकांना आमंत्रित करतात. यामुळे कमी वेळात मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात.