लोकसत्ता खास प्रतिनिधी

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) प्रलंबित परीक्षांच्या जाहिरातींमध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता अधिनियम २०२४ मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता सुधारित आरक्षण निश्चिती केली जाणार आहे. यामुळे ‘एमपीएससी’च्या अनेक परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. तीन महिन्यांपूर्वी स्थगित झालेली समाजकल्याण विभागातील विविध पदांच्या परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यातच विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने आचारसंहिता लागल्यास परीक्षा आणखी लांबणीवर पडण्याची भीती विद्यार्थ्यांना आहे.

‘एमपीएससी’ने मे २०२३ मध्ये समाज कल्याण विभागातील साहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित गट अ, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग ४१, समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग २२, गृहप्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातील १८ अशा विविध पदांसाठी जाहिरात दिली होती. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले आहेत. ‘लोकसत्ता’ने सातत्याने हा विषय लावून धरल्यानंतर आयोगाने अभ्यासक्रम आणि परीक्षेची तारीख जाहीर केली. त्यानुसार १९ मे रोजी समाज कल्याण अधिकारी गट ‘ब’ या पदासाठी परीक्षा होणार होती. मात्र, आयोगाने सुधारित आरक्षणनिश्चिती प्राप्त झाल्यानंतरच परीक्षांबाबत घोषणा केली जाईल, असे सांगत परीक्षा स्थगित केली. ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’ ही परीक्षाही स्थगित करण्यात आली होती. मात्र, मराठा आरक्षणानुसार नवीन आरक्षण निश्चिती करून आयोगाने नागरी सेवा परीक्षेची सुधारित तारीख जाहीर केली. परंतु समाज कल्याण विभागातील विविध पदे आणि अन्य विभागांच्या परीक्षांची तारीख अद्याप जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागल्यास परीक्षा पुन्हा लांबणीवर पडतील आणि अधिक कालपव्यय होईल, याची विद्यार्थ्यांना भीती आहे.

हेही वाचा >>>यवतमाळ : महागाव तालुक्यात सशस्त्र दरोडा, ३० लाख रोख व १७ तोळे सोन्याचे दागिने लुटले; महिलांना अमानुष मारहाण

लांबणीवर पडलेल्या एमपीएससीच्या परीक्षा जाहीर होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची टांगती तलवारही आहे…

चिंता का?

●तारखा जाहीर झाल्या तर विद्यार्थ्यांना अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे सोपे जाते.

●परीक्षा लांबणीवर गेल्यास पुण्यासारख्या शहरांत राहून आर्थिक भार सहन करावा लागतो.

●वेळेत परीक्षा न झाल्यामुळे अन्य परीक्षांची तयारी करता येत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

●परीक्षा लांबल्यामुळे मानसिक दडपण वाढत जाते.